विकास शहा --शिराळा --छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करून नेताना त्यांना सोडविण्याचा एकमेव प्रयत्न शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर झाला. मात्र हा किल्ला पूर्ण दुर्लक्षित आहे. यामुळे आता चक्क युवकांनीच स्वनिधीतून या किल्ल्यावरील ऐतिहासिक विहीर स्वच्छतेचे काम हाती घेतले असून, विहिरीतून एका भुयारी मार्गाचा शोध लागला आहे. एवढेच नव्हे, तर काही ऐतिहासिक वस्तूही उजेडात आल्या आहेत. भुईकोट किल्ला हे शिराळ्याच्या इतिहासातील एक सुवर्णपानच म्हणावे लागेल. छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली, त्यावेळी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न सरदार आप्पाशास्त्री दीक्षित, सरदार तुलाजी देशमुख, सरदार जोताजी केसरकर, हरबा वडार यांच्यासह ४00 सैनिकांनी केला होता. मात्र सैन्यबल कमी असल्याने हा एकमेव प्रयत्न अयशस्वी झाला होता.सध्या हा भुईकोट किल्ला पूर्ण दुर्लक्षित झाला आहे. त्यामुळे या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. येथील शिवप्रतिष्ठान, हिंदवी स्वराज्य गु्रपचे शिवकुमार आवटे, नीलेश आवटे, लालासाहेब शिंदे, प्रमोद पवार, रोहन म्हेत्रे, श्रीराम नांगरे, अण्णा पाटील, दर्शन जोशी, श्रीराम गरगटे, आकाश सपाटे, महेश गवंडी, फत्तेसिंग जोशी, नागेश लोहार आदी युवकांनी या किल्ल्यावरील ऐतिहासिक विहिरीच्या साफसफाईचे काम हाती घेतले आहे.या विहिरीत जवळजवळ २0 फुटांपर्यंत माती, दगड होते. त्यामुळे या विहिरीतील भुयारी मार्ग कोणालाही दिसत नव्हता. जेव्हा सर्व दगड, माती उपसण्यात आली, तेव्हा हा मार्ग खुला झाला. तसेच मुजलेल्या पायऱ्या, दगडी दिवे, महादेवाच्या पिंडीला अभिषेक करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे दगडावर कोरलेले चित्रशिल्प, अशा वस्तू सापडल्या आहेत. या विहिरीत खुदाई करताना आणखी काही ऐतिहासिक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. किल्ल्यावरील कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धारही काही वर्षांपूर्वी करण्यात आला आहे.शिराळ्याचा भुईकोट आजवर शासन, पुरातन विभागाकडून दुर्लक्षित राहिला आहे. येथील तुळजाभवानी मंदिर, हनुमान मंदिर या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे येऊ न गेल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. या ऐतिहासिक विहिरीची शासनाकडून आणखी संशोधन करून इतिहासकालीन पुरावे शोधण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.- जयंतराव देशमुख, शिराळा
शिराळ्याच्या भुईकोटात शिवाजी महाराजांचे चित्रशिल्प
By admin | Published: March 04, 2017 12:53 AM