पेठवडगाव : उंडाळे (ता.कराड) येथे कराड- रत्नागिरी महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून दुचाकीखाली कोसळल्याने दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातातील दोघे मृत व जखणी भेंडवडे (ता.हातकणंगले) येथील आहेत. पूल बांधकाम सुरू असताना,बंदचा ठळक फलक व व्यवस्थित रस्ता अडविला नसल्यामुळे हा अपघात झाल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. अपघात जानू भैरु झोरे, कोंडीबा भागोजी पाटणे असे दुर्दैवी मृत झालेल्याची तर दगडू बिरू झोरे (सर्व रा धरणग्रस्त वसाहत ,भेंडवडे )असे गंभीर जखमी झालेल्यांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,कराड - रत्नागिरी राज्यमार्गावर उंडाळे गावाच्या हद्दीत पुलाचे बांधकाम सुरू आहे. रविवारी (दि.१८) मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडे येथील पुनर्वसित वसाहतीत राहणारे जानू भैरु झोरे, कोंडीबा भागोजी पाटणे आणि दगडू बिरू झोरे हे तिघेजण मोटरसायकल वरून भेंडवडेकडे येत होते.
यावेळी पुलाचे बांधकाम सुरू आहे, हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे मोटरसायकल थेट पुलावरून खाली कोसळली. या अपघातात जाणू भैरु झोरे, कोंडीबा भागोजी पाटणे हे दोघे जागीच ठार झाले तर दगडू बिरू झोरे हे गंभीर जखमी झाले. रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह आणि दुचाकी कराड ग्रामीण पोलिसांनी बाहेर काढले.