कोल्हापूर : राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत शिवाजी पाटील, विनायक जाधव, आभा शंशाक देशपांडे यांच्यासह सातजणांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांचे वितरण प्रजासत्ताकदिनी रविवारी (दि. २६) सकाळी ८.१५ वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे.जिल्ह्यातील व्हॉलीबॉलमधील शिवाजी पांडुरंग पाटील यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, तर फेन्सिंग सॅपक टाकरा क्रीडा प्रकारातील विनायक दिगंबर जाधव यांना गुणवंत क्रीडा कार्यकर्ता-संघटक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
पॉवरलिफ्टिंगमधील सुनील परशराम कोनेवाडकर, जलतरणातील आभा शंशाक देशपांडे आणि क्रिकेट, अॅथलेटिक्समधील कमलाकर सुरेश कराळे (दिव्यांग) यांना गुणवंत खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पॉवरलिफ्टिंगमधील सोनल सुनील सावंत आणि टेबल टेनिसमधील वैष्णवी विनायक सुतार हिला गुणवंत खेळाडू थेट पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रोख १0 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी दिली.
‘खेलो इंडिया’तील खेळाडूंचा सत्कारया सर्व पुरस्कारांसाठी एकूण १६ अर्ज कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. त्यातून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती’ने हे पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यांच्या वितरणावेळी ‘खेलो इंडिया स्पर्धे’तील पदक प्राप्त खेळाडूंचाही सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती साखरे यांनी दिली.