कोल्हापूर : जुना बुधवार पेठेतील कार्यकर्त्यांचे काम नेहमीच कौतुकास्पद राहिले असून, पर्यायी शिवाजी पुलाच्या पूर्णत्वासाठी शासनाने लवकरच वटहुकूम काढावा; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला.दिल्ली येथे प्रथमच शिवजयंती उत्साहात साजरी केल्याबद्दल खासदार संभाजीराजे यांचा संयुक्त जुना बुधवार सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी सायंकाळी तोरस्कर चौकात जाहीर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवाजी पूल दुर्घटनेत बचावकार्य करणाऱ्या पथकाचा संयुक्त जुना बुधवार फुटबॉल संघ, संयुक्त बुधवार क्रिकेट संघाचा खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.दिल्ली येथे शिवजयंती उत्साहात साजरी केल्याबद्दल, कोल्हापुरात प्रथमच संयुक्त जुना बुधवार संस्थेच्या वतीने सत्कार केल्याबद्दल, खासदार संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. शिवाजी पुलाला मंजुरी मिळण्याबाबत राज्यसभेत आपण भरपूर प्रयत्न केले; पण राज्यसभेचे कामकाज तहकूब झाल्याने हा प्रश्न रेंगाळला आहे. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पुलाबाबत वटहुकूम काढावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दिला. याप्रसंगी जुना बुधवारातील कार्यकर्त्यांचे काम नेहमीच धाडसाचे असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.माजी नगरसेवक धनंजय सावंत यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी स्वागत केले. याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे, नगरसेवक विजय सूर्यवंशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, संयुक्त जुना बुधवार संस्थेच्या उत्सव कमिटीचे अध्यक्ष राहुल घाटगे, उपाध्यक्ष अभिजित बुकशेट, सचिन क्षीरसागर, अक्षय हंडे, संदीप राणे, आदी उपस्थित होते.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यता द्याशिवाजी पुलाच्या बांधकामाचा अर्धवट रेंगाळलेला प्रश्न सोडवावा; तसेच पुलानजीकच्या चौकात प्रतिष्ठापना केलेल्या १३ फूट उंच अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्याच ठिकाणी मान्यता मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा सुशील भांदिगरे आणि प्रशांत कुरणे यांनी भाषणात खासदार संभाजीराजे यांच्याकडे व्यक्त केली.
शिवाजी पूलप्रश्नी प्रसंगी रस्त्यावर उतरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:03 AM