कोल्हापूर : नववारीतील तरुणी, खादीचे कपडे घातलेले प्राध्यापक व तरुण, टाळ-मृदंगाच्या साथीत अवघा आसमंत दुमदुमून टाकणारा ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष अशा भावपूर्ण वातावरणात निघालेल्या ग्रंथदिंडीने शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा दीक्षांत समारंभच्या सोहळ्यास गुरुवारी सकाळी सुरुवात झाली.दीक्षांन्त समारंभानिमित्त कमला कॉलेज येथून सकाळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करून दिंडीस प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पारंपारिक वेशभूषा, वाचन संस्कृतीचा संदेश देणारे फलक हातात घेवून युवक - युवतींंनी ग्रंथदिंडीच्या माध्यमातून प्रबोधनाचा जागर केला.राजारामपुरी पहिली गल्ली, माऊली पुतळा चौक, सायबर चौक, दूरशिक्षण केंद्रमार्गे दिंडी विद्यापीठात आली. दिडीच्या अग्रभागी फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये ग्रंथ ठेवण्यात आले होते. वाचनसंस्कृतीबाबत प्रबोधन करणारे फलकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. जय जवान, जय किसान, जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणांनी वातावरणात स्फुलिंग संचारले.शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर दिंडी आल्यानंतर येथे विद्यापीठाच्या महिला कर्मचारी व मुलींनी ही ग्रंथदिंडी खांद्यावर घेतली. त्यानंतर लोककला केंद्रात ग्रंथदिंडीतील पालखी ठेवण्यात आली.
या ग्रंथदिंडीत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, प्राचार्य डॉ. क्रांतीकुुमार पाटील, डॉ. डी. के. गायकवाड, डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गांधी टोप्या....विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या गांधी टोप्या हेच ग्रंथदिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले. ‘मााणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक’, ‘ग्रंथ आमुचे साथी’, ‘ग्रंथ आमुचे हाती’ अशा घोषणा करीत ग्रंथदिंडी पुढे सरकत होती.