कोल्हापूर : रंगीबेरंगी फुलांनी सध्या शिवाजी विद्यापीठाचा परिसर फुलला आहे. कॉसमॉस, मेक्सिकन सनफलॉवर, कुुर्डू, सीतेचे आसू, केना, अकेशिया, अशा विविध ७६ प्रकारांचा फुलांचा त्यामध्ये समावेश आहे. या फुलांमुळे विद्यापीठाच्या निसर्गसौंदर्यात भर पडली आहे.पावसाचा प्रारंभ झाल्यानंतर विद्यापीठात विविध प्रकारची फुले फुलण्यास सुरुवात होते. यंदा त्याची सुरुवात जुलैपासून झाली आहे. विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्रासमोरील खडकाळ भागात केना गवताची जांभळी, गुलाबी आणि पांढरी फुले दिसून येत आहेत. पश्चिम भागात असलेल्या मुलांचे वसतिगृह ते कँटिन, आरोग्य केंद्र ते संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग मार्गाच्या बाजूने कॉसमॉसची केशरी, पिवळा आणि गुलाबी रंगांची फुले आणि रसायनशास्त्र अधिविभाग ते सिंथेटिक ट्रॅक या मार्गावरील परिसरात फुललेली गुलाबी रंगांची फुले लक्ष वेधून घेत आहेत.
मुलांच्या वसतिगृहामागील बाजूला काहीसा केशरी आणि लाल रंगाच्या मेक्सिकन सनफ्लॉवरच्या फुलांची पसरलेली चादर मनमोहक दिसत आहे. क्रीडा अधिविभागाच्या मैदान परिसरात सीतेचे आसू या प्रकारची फुले दिसून येत आहेत. या रंगीबेरंगी फुलांमुळे निसर्गाचे वेगळे रूप याठिकाणी पाहण्यास मिळत आहे.
आॅक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत ही विविध प्रकारची फुले याठिकाणी पाहायला मिळतील. वि. स. खांडेकर भाषाभवनामागील आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या परिसरातील तलाव आणि विविध नऊ विहिरी काठोकाठ भरल्या आहेत. ही फुले आणि निसर्गरम्य वातावरण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी त्या परिसरात छायाचित्रे आणि सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थी, नागरिकांची गर्दी होत आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात रानफुलांचे प्रमाण वाढत आहे. त्यामध्ये आणखी फुलांची भर घालण्याचा प्रयत्न उद्यान विभाग करत आहे. क्वचित दिसणाऱ्या फुलझाडे आणि वनस्पतींची संख्या जाणीवपूर्वक वाढविण्यात येत आहे.- डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ
पांढऱ्या रंगाचे कृष्णकमळकृष्णकमळ हे अधिकतरवेळा जांभळ्या रंगांचे असते. मात्र, विद्यापीठातील सुतार विहीर परिसरात पांढऱ्या रंगाचे कृष्णकमळ फुलले आहे. ते लक्ष वेधून घेत आहे.