संभाजी ब्रिगेडकडून स्वागत, कठोर कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : फडके बुक हाऊसने इतिहासाच्या पुस्तकात संभाजी महाराजांची बदनामी केल्याच्या प्रकाराची शिवाजी विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांनी फडके बुकची पुस्तके अभ्यासक्रमात वापरू नयेत, असे परिपत्रक शनिवारी काढले.
संभाजी ब्रिगेडचे रूपेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी फडके बुक प्रकाशनकडून होत असलेला बदनामीचा प्रकार उघडकीस आणला होता. यावर तातडीने कुलगुरूंनी संभाजी ब्रिगेडच्या मागणीनुसार बैठक घेतली. यात पुस्तकावर बंदी घालत असल्याचे जाहीर केले होते, तसेच हे आक्षेपार्ह मजकूर असलेले पुस्तक मागे घ्यावे असे प्रकाशनाला कळवले होते. शनिवारी यापुढे आणखी एक पाऊल पुढे टाकत हे पुस्तक अभ्यासक्रमात ठेवू नये असे आदेश काढले आहेत. याचे संभाजी ब्रिगेडने स्वागत केले आहे; पण फडके प्रकाशनने केलेली चूक गंभीर असल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
प्रतिक्रिया
उशिरा का होईना, शिवाजी विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; तसेच यासह अन्य प्रकाशनांच्या पुस्तकांची चिकित्सा तत्काळ करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. फडके प्रकाशनवर फौजदारी गुन्हा दाखल करून सर्व पुस्तके जप्त करावीत. असे न केल्यास संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहे.
रूपेश पाटील, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, कोल्हापूर