कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राकडील सर्व अभ्यासक्रमांना नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) मान्यता दिली. आता विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राकडील प्रवेश प्रक्रियेची सुरूवात केली जाणार आहे. युजीसीकडून मान्यता मिळालेल्या बी.ए., बी.कॉम., एम.ए. भाषा (इंग्रजी, हिंदी, मराठी), एम.ए. सामाजिकशास्त्रे (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र), एम.कॉम., एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए या पदवी व पदव्युत्तर विषयांची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन असून कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांतील ८१ अभ्यास केंद्रांमध्ये विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, सैनिक, उद्योजक, शेतकरी, कामगार व बंदीजन आदी शिक्षणापासून वंचित घटकांना प्रवेश घेता येणार आहे.
दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून आता मान्यता मिळाली असल्याने ज्या व्यक्ती व्यवसाय, नोकरी व अन्य कारणांमुळे प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत, अगर काही कारणांनी ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिलेले आहे, अशा व्यक्तींनी सदर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा. - डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू