कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव ऑनलाईन भरणार आहे. प्रत्येक जिल्हानिहाय स्वतंत्र महोत्सवाचे नियोजन झाले असून, सांगलीचा महोत्सव सोमवापासून तीन दिवस होत आहे. कोल्हापूर व साताऱ्याच्या तारखा निश्चित आहेत; पण अजून स्थळ ठरलेले नाही.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकत्र जमण्यावर मर्यादा आल्याने विद्यार्थ्यांच्या औत्सुक्याचा आणि आनंदाचा क्षण असणारा युवा महोत्सव साजरा होणार की नाही यावर सांशकता व्यक्त होती. गेल्या वर्षी महोत्सव भरलाच नव्हता, त्यामुळे विद्यार्थ्यांचाही हिरमोड झाला होता. यंदा मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे धोरण निश्चित करून त्याप्रमाणे नियोजनही करण्यात आले आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या विद्यापीठात जिल्हानिहाय महोत्सव भरणार आहे. सांगलीचा महोत्सव १२ ते १४ या काळात वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयात होणार आहे.
सोमवारी (दि. १२) सकाळी नऊ वाजता प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, अभिनेत्री नमिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. गुगल मीट या ॲपवर हा कार्यक्रम सादर होणार असून, यात सहभागी होण्यासह याचा आनंदही याच ॲपवर घेता येणार आहे.महोत्सवात पहिल्या दिवशी उद्घाटन झाल्यानंतर रांगोळी, वक्तृत्व, शास्त्रीय गायन, व्यंगचित्र, शास्त्रीय सुरवाद्य असे कलाप्रकार होणार आहेत. दुसऱ्या दिवशी मंगळवारी भित्तीचित्र, शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, कातरकाम, एकपात्री अभिनय, मेंहदी, पाश्चिमात्य वाद्य वादन अशा स्पर्धा होणार आहेत. बुधवारी महोत्सवाची सांगता वक्तृत्व, पाश्चिमात्य संगीत वादन, मातीकाम, एकल गायन, नकला अशा स्पर्धांनी होणार आहे.