कोल्हापूर : प्रलंबित असलेल्या निकालामुळे शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी हैराण झाले आहेत. परीक्षा होऊन तीन ते चार महिने उलटले, तरी निकाल जाहीर झाला नसल्याने, आपले वर्ष वाया जाण्याची भीती या विद्यार्थ्यांना वाटत आहे.पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेची प्रवेशपत्रे, अर्ज आणि निकाल लावण्याबाबतच्या प्रक्रियेचे कामकाज शिवाजी विद्यापीठाने गेल्या काही वर्षांपूर्वी एका संस्थेकडे दिले. या संस्थेच्या माध्यमातून होणारे परीक्षाविषयक कामकाज थांबविण्यात आले.
मात्र, या संस्थेकडे परीक्षांबाबतच्या माहितीचे हस्तांतरण करून घेण्याचे काम अद्यापही पूर्णपणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून झालेले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत.
काही विद्यार्थ्यांच्या जाहीर झालेल्या निकालात त्रुटी आहेत. विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे. निकाल प्रलंबित असल्याने आणि त्यामध्ये त्रुटी असल्याने सुधारित निकाल मिळालेला नाही. त्यामुळे पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.
प्रथम आणि द्वितीय वर्षांतील ज्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत, त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात प्रवेशनिश्चिती केली आहे. मात्र, अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची निकालाअभावी मोठी अडचण झाली आहे.
दरम्यान, याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली कार्यवाही जाणून घेण्यासाठी या मंडळाचे संचालक महेश काकडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मोबाईल घेतला नाही.
नीट माहिती देत नाहीतबी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., आदी अभ्यासक्रमांचे निकाल प्रलंबित आहेत. निकाल प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी निकालाबाबत महाविद्यालयात चौकशी केली असता, त्यांना विद्यापीठात चौकशी करण्यास सांगितले जात आहे.
निकालाच्या अनुषंगाने विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन विभागात दूरध्वनीवरून अथवा प्रत्यक्षात येऊन विचारणा केली असता, नीट माहिती दिली जात नाही. त्यात अनेकदा टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार सातारा, सांगलीतील विद्यार्थ्यांकडून होत आहे.
प्रवेश अथवा परीक्षा अर्ज आणि शुल्क भरणे, पात्रता सादर करणे, आदी प्रक्रियेची पूर्तता करून घेण्यासाठी विद्यापीठाकडून महाविद्यालयांच्या माध्यमातून वारंवार सूचना केल्या जातात.
पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्रित कामकाज असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू आणि अन्य अधिकारी सांगतात. मात्र, निकालाच्या अनुषंगाने नेमकी काय अडचण निर्माण झाली आहे, त्याची नीट माहिती देण्यात विद्यापीठाकडून का टाळाटाळ केली जात आहे? असा सवाल या विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.