कोल्हापूर : कोरोनानंतर तब्बल अडीच वर्षांनी शिवाजी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आज, सोमवारपासून ऑफलाइन वर्णनात्मक स्वरूपात होणार आहेत. हिवाळी सत्रातील विविध अभ्यासक्रमांचे सुमारे २ लाख ५० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. आदी अभ्यासक्रमांच्या सत्र तीन, चार, पाच आणि सहाच्या, तर अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि चौथ्या वर्षाच्या परीक्षा हिवाळी सत्रामध्ये होतील. या परीक्षा सकाळी साडेदहा ते दुपारी दीड आणि दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच अशा दोन सत्रांमध्ये होणार आहेत. त्यासाठी ‘एसआरपीडी’ प्रणालीद्वारे प्रश्नपात्रिका पाठविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. उत्तरपत्रिका तपासणीसाठी क्लस्टर कॅप (सामूहिक केंद्र) निश्चित करून शिक्षक, कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत परीक्षा सुरू राहतील. उन्हाळी सत्रापेक्षा हिवाळी सत्रात होणाऱ्या परीक्षांची संख्या अधिक आहे. दरम्यान, दोन वर्षांनी ऑफलाइन वर्णनात्मक स्वरूपात परीक्षा होत आहे. ऑनलाइन शिक्षण आणि एमसीक्यू उत्तरपत्रिकांची सवय कोरोनाकाळात झाल्याने हिवाळी सत्रातील परीक्षेत विद्यार्थ्यांचा लिखाणाच्या पातळीवर कस लागणार आहे.
हिवाळी सत्रातील परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. ऑफलाइन वर्णनात्मक स्वरूपात परीक्षा होतील. उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. -डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
आकडेवारी दृष्टिक्षेपातहिवाळी सत्रात होणाऱ्या एकूण परीक्षा : ७५०परीक्षा केंद्रे : २८३एकूण परीक्षार्थी : २ लाख ५० हजार