कोल्हापूर : बीपीएडची पदवी ६० हजार, तर एमपीएडची पदवी ७५ हजार रुपयांत उपलब्ध असून संपर्क साधण्याचे नांदेडमधील असल्याचे सांगणाऱ्या एका युवकाने चक्क फेसबुकवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये शिवाजी विद्यापीठाचा उल्लेख आहे. त्याची विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन राजारामपुरी आणि सायबर पोलीस ठाण्यात पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन विविध संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले.या पोस्टची माहिती ह्यलोकमतह्णने बुधवारी (दि. १२) विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांना दिली. त्यांनी या संदेशातील क्रमांकावर संपर्क साधून काही माहिती घेतली आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने गुरुवारी दक्षता म्हणून आणि या संदेशाच्या अनुषंगाने अधिक चौकशी व्हावी, यासाठी राजारामपुरी आणि सायबर पोलीस ठाण्यात डॉ. नांदवडेकर यांनी तक्रार दाखल केली.
दरम्यान, आणखी काही घटना उघडकीस येण्यासाठी या बनावट डिग्री प्रकरणाच्या तपासासाठी विद्यापीठाने सीआयडीकडे तक्रार दाखल करावी, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे संस्थापक-अध्यक्ष वसंतराव मगदूम यांनी केली.
विद्यापीठाचे नाव वापरून पदव्या देण्याबाबत फेसबुकद्वारे आवाहन करणाऱ्या युवकास कठोर शासन होण्यासाठी विद्यापीठाने पावले उचलावीत. त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विद्यापीठ शिक्षक संघाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा कार्यवाह डॉ. सुभाष जाधव यांनी केली.
सध्या कोरोना काळातील अडचणीच्या परिस्थितीचा अनेक लोक गैरफायदा घेताना दिसत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने वेळीच सावध व्हावे. सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, हरीश कांबळे यांनी केली.
शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा वापर करून बीपीएड, एमपीएडच्या पदवीबाबतची जी पोस्ट सोशल मीडियावरून प्रसारित झाली आहे. त्याची गांभीर्याने दखल घेऊन विद्यापीठाने त्या अनुषंगाने पुढील तपासासाठी राजारामपुरी आणि सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या पदवीबाबतच्या संबंधित पोस्टवर विद्यार्थी, पालकांनी विश्वास ठेवू नये.- डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ