कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दिक्षांत समारंभाच्या पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाई गोंधळाबाबत कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी दुपारी शिवाजी विद्यापीठात सुरु असलेली व्यवस्थापन परिषदेची बैठक काहीकाळ रोखून धरली. याबाबत समिती नेमून तीन महिन्यात अहवाल देण्याचे लेखी आश्वासन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या बैठकीत कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परिक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. महेश काकडे, प्रकुलगुरु डॉ. शिर्के यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, यासंदर्भात उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांवर वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करण्यासाठी कुलगुरुंच्या आदेशान्वये व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येईल, समितीच्या बैठका त्वरित आयोजित करुन तीन महिन्यात अहवाल देण्याचे लेखी आश्वासन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश सहमंत्री साधना वैराळे, जिल्हा संयोजन श्रीनिवास सूर्यवंशी, ओंकार मगदूम (इचलकरंजी) तसेच गणेश जाधव, दिपांजली पिसे (सांगली) यांनी केले.