कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या एम. फिल. आणि पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यावर्षी एकूण ११८२ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी विद्यापीठातर्फे आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम मुदत दि. १९ जुलैपर्यंत आहे.यावर्षी एम. फिल. विविध २६ अभ्यासक्रमांसाठी २८३, तर पीएच.डी. विविध ४८ अभ्यासक्रमांसाठी ८९९ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी दि. ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.
या परीक्षेकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया आॅनलाईन असून त्यासाठीची अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत आहे. प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.
दरम्यान, यावर्षी पीएच.डी.च्या सर्वाधिक ७८ जागा इंग्रजी विषयासाठी उपलब्ध आहेत. त्यापाठोपाठ रसायनशास्त्र (७४), मराठी (५७), भौतिकशास्त्र (५२), शिक्षणशास्त्र (५१), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (४३), अर्थशास्त्र (४२), हिंदी (४०), प्राणीशास्त्र (३६), वनस्पतीशास्त्र (३०), व्यावसायिक व्यवस्थापन (२९) हे अभ्यासक्रम आहेत.
पत्रकारिता, गणित अभ्यासक्रमांसाठी एम. फिल.ची प्रत्येक एक तर, फूड अॅण्ड सायन्स् अॅण्ड टेक्नॉलॉजी, पर्यावरणशास्त्र आणि अभियांत्रिकी, फूड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या पीएच.डी.साठी प्रत्येकी एक जागा उपलब्ध आहे.
एम. फिल.साठी अधिक जागा असणारे अभ्यासक्रमइंग्रजी (३७), मराठी (२७), रसायनशास्त्र (२३) हिंदी (२२), शिक्षणशास्त्र (१९), वनस्पतीशास्त्र (१८), भौतिकशास्त्र (१७), अर्थशास्त्र (१६) या अभ्यासक्रमांसाठी एम. फिल. साठीच्या अधिक जागा आहेत.