कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा सुरू झाल्या. या सत्रात एकूण २ लाख ९० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांवर त्यांचे छायाचित्र नसल्याने अडचण निर्माण झाली.बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बी. बी. ए., बी. सी. ए. अशा विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या एक ते सहा सत्रांतील ६४० परीक्षा उन्हाळी सत्रामध्ये होणार आहेत. विद्यापीठ संलग्नित कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण २८३ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रे आहेत. या परीक्षांची सुरुवात मंगळवारपासून झाली.
पहिल्या टप्प्यात विविध ५० विषयांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. सकाळी अकरा ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच या सत्रांत परीक्षा झाली. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या गर्दीने महाविद्यालयांचा परिसर फुलला. पेपरपूर्वी परीक्षार्थींनी बैठक व्यवस्थेची माहिती घेतली. परीक्षा कक्षात जाण्यापूर्वी अनेक विद्यार्थी पेपरच्या विषयांची धावती उजळणी करताना दिसत होते. पेपर सुटल्यानंतर त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. दरम्यान, काही विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून मिळालेल्या प्रवेशपत्रावर त्यांचे छायाचित्र नसल्याचे आढळून आले.
परीक्षा कक्षात आपणच परीक्षार्थी असल्याचे पटवून देताना या विद्यार्थ्यांची अडचण झाली. विद्यापीठातील विभाग, महाविद्यालयांकडून योग्य माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे प्राप्त झाली नसल्याने काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राबाबत असा प्रकार घडल्याचे समजते.
याबाबत विद्यापीठाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर छायाचित्र नसल्याचे खरे आहे. त्याबाबत आयटी सेलकडून माहिती घेतली जात आहे. त्यावर पर्याय काढण्यात येईल. विद्यार्थ्यांची अडचण होऊ देणार नाही.
विविध ३४ विषयांसाठी ‘एसआरपीडी’चा वापरविद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळातर्फे सकाळ आणि दुपारच्या सत्रांत ३४ विषयांच्या प्रश्नपत्रिका ‘एसआरपीडी’ प्रणालीद्वारे पाठविण्यात आल्या. त्यामध्ये नॅनोसायन्स, बँक मॅनेजमेंट, बी. कॉम. (आय. टी), आदी विषयांचा समावेश होता. दोन्ही सत्रांत बाराहून अधिक विषयांचे पेपर छापील स्वरूपात पाठविण्यात आले.