कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात पीएच. डी. व त्याच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या शोधनिबंधाचा दर्जा खालावत असून अनेक संशोधक विद्यार्थी कॉपी पेस्ट करून शोधनिबंध सादर करतात. संबंधित मार्गदर्शकही काहीही न पाहता त्याला मान्यता देतात, असा आरोप डॉ. राजवर्धन कापशीकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.डॉ. कापशीकर म्हणाले, विद्यापीठात कॅन्सरसारख्या विषयांवर काहींनी शोधनिबंध सादर केले आहेत. मात्र, हेच निबंध एक-दोन ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत. विद्यापीठात कॅन्सरसारख्या विषयावर संशोधन करण्यासाठी सुविधा नसतानाही हे संशोधन झाले कसे ? संशोधनाच्या नावाखाली धूळफेक सुरू आहे. दुसऱ्यांनी केलेले संशोधन आपलेच आहे, असे भासवले जाते. यात कॉपी पेस्टचा प्रकार केला जातो. मार्गदर्शकही काहीही न पाहता याला मान्यता देतात.याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. पण, त्यांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. यावेळी कापशीकर यांनी दोन प्रबंध कॉपी पेस्ट केल्याचे पुरावे दाखविले. याबाबत डॉ. कापशीकर यांनी २६ जुलैला विद्यापीठाकडे तक्रार केली होती.
बॉटनी, केमिस्ट्रीच्या शोधनिबंधांवर आक्षेपबॉटनी विषयातील एक शोधनिबंध कॉपी पेस्ट केल्याचा आरोप कापशीकर यांनी केला. त्याचे पुरावेच त्यांनी सादर केले. केमिस्ट्रीतील एक शोधनिबंध चुकीच्या पद्धतीने मांडला असून अशाने याचा दर्जा खालावत असल्याचे ते म्हणाले. मायक्रोबायोलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी या विषयांमधील शोधनिबंधांवरही त्यांनी आक्षेप घेतले.
तथ्य आढळल्यास चौकशी होणारडॉ. कापशीकर यांनी ज्या-ज्या संशोधन निबंधासंदर्भात आक्षेप घेतले आहेत, त्या संबंधित संशोधन निबंधांच्या संशोधक शिक्षक, मार्गदर्शक यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यास शिवाजी विद्यापीठाने सांगितले आहे. त्यांचे म्हणणे आल्यानंतर या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास विद्यापीठ पुढील चौकशीची दिशा निश्चित करेल, असे प्र. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले.