कोल्हापूर : ‘शिक्षकविरोधी कुलगुरूंचा धिक्कार असो’, ‘विद्यार्थ्यांच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या कुलगुरूंचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) मंगळवारी कुलगुरूंविरोधात निदर्शने केली.गैरव्यवहारांचे विविध प्रमाद, बेकायदेशीर कारभार, शिक्षकांवर अन्याय, विद्यार्थिहिताकडे दुर्लक्ष, आर्थिक उधळपट्टी, असे विविध आरोप शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर ‘सुटा’ने केले आहेत.
कुलगुरूंच्या प्रमादांची, गैर व भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी ‘सुटा’ने आंदोलन सुरू केले आहे. त्यातील एक टप्पा म्हणून मंगळवारी दुपारी तीननंतर सुटाचे पदाधिकारी, सभासद प्राध्यापक विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमले. त्यांना प्रशासनाने मुख्य इमारतीसमोर आंदोलन करण्यास परवानगी दिली नाही; त्यामुळे त्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. त्यांनी कुलगुरूंच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी झालेल्या निषेध सभेत ‘सुटा’चे सहकार्यवाह सुभाष जाधव यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात ‘सुटा’चे ज्येष्ठ सल्लागार प्रा. सुधाकर मानकर, अध्यक्ष आर. एच. पाटील, प्रमुख कार्यवाह डी. एन. पाटील, कार्यालय कार्यवाह यु. ए. वाघमारे, उपाध्यक्ष अरुण पाटील, ए. बी. पाटील, एस. ए. बोजगर, टी. व्ही. स्वामी, श्रद्धा कोठावळे, अनिता कणेगावकर, सुनीता अमृतसागर, ए. पी. देसाई, सचिन पाटील, आदी सहभागी झाले. दरम्यान, विद्यापीठ विद्या परिषदेची बैठक असल्याने कुलगुरूंच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी ‘सुटा’चे निवेदन स्वीकारले.
६६ कलमांचे उल्लंघन, ११ आदेशांची पायमल्लीकुलगुरूंना त्यांच्याकडून झालेल्या प्रमादांची निवेदनाद्वारे माहिती दिली. मंगळवारी (दि. २२) त्यांच्याशी ‘सुटा’च्या शिष्टमंडळाने चर्चा केली; पण त्यांच्याकडून काहीच ठोस कार्यवाही झालेली नाही; त्यामुळे ‘सुटा’ने आज निदर्शने केली. मंगळवारी (दि. १२) धरणे आंदोलन करणार आहेत.
विविध मागण्यांबाबत कार्यवाही व्हावी, अन्यथा २२ फेब्रुवारीला दीक्षान्त समारंभावेळी मूक निदर्शने करण्यात येतील, असा इशारा ‘सुटा’चे ज्येष्ठ सल्लागार प्रा. मानकर यांनी दिला. ते म्हणाले, कुलगुरूंकडून आजअखेर १०८ प्रमाद घडले आहेत. त्यामध्ये नवीन विद्यापीठ कायद्यातील एकूण १४८ कलमांपैकी ६६ कलमांचे उल्लंघन झाले आहे. शासनाच्या ११ आदेशांची पायमल्ली, १३ परिनियमांचा भंग झाला आहे. युजीसी रेग्युलेशनचे पाचवेळा उल्लंघन, विद्यापीठाच्या एका कलमाचा तर ११ वेळा भंग झाला आहे.