कोल्हापूर : राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे (नॅक) ‘अ’ मानांकन मिळवून गुणवत्तेचा केंद्रबिंदू दक्षिण महाराष्ट्राकडे शिवाजी विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपूर्वी सरकविला. त्यापुढे एक पाऊल टाकत आता नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फे्रमवर्कच्या (एनआयआरएफ) राष्ट्रीय क्रमवारीत २८ वे आणि महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांमध्ये अव्वल स्थान पटकावत पुन्हा एकदा गुणवत्तेत शिवाजी विद्यापीठाने भारी असल्याचे सिद्ध केले आहे. विद्यापीठासह इस्लामपूरच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि कोल्हापुरातील भारती विद्यापीठाच्या फार्मसी महाविद्यालयाने ‘टॉप-१००’ महाविद्यालयांच्या यादीत स्थान पटकावून बाजी मारली आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे ‘एनआयआरएफ’ ही देशातल्या ‘टॉप-१००’ विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांची क्रमवारी सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. त्यामध्ये तीन अकृषी विद्यापीठे आहेत. त्यात शिवाजी विद्यापीठ २८व्या स्थानी, तर जळगावचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे अनुक्रमे ५९ व ८७व्या स्थानी आहेत. यासह शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित दोन महाविद्यालयांनीही टॉप-१०० महाविद्यालयांच्या यादीत स्थान मिळविले आहे. अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीने राष्ट्रीय क्रमवारीत ७५वे, तर राज्यस्तरीय यादीत सातवे स्थान मिळविले आहे. फार्मसी संस्थांच्या यादीत कोल्हापुरातील भारती विद्यापीठाच्या फार्मसी महाविद्यालयाने राष्ट्रीय क्रमवारीत २५वे, तर राज्यस्तरीय यादीत पाचवे स्थान मिळविले आहे. दरम्यान, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, संशोधनपर व व्यावसायिक कृतीशीलता, विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण, महिलांसह विविध वंचित समाज घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे प्रयत्न आणि विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांशी संवाद व समन्वय या निकषांवर ही क्रमवारी आधारित आहे. ‘टॉप-१००’ मध्ये मुंबई, पुणे नाही ‘एनआयआरएफ’ जाहीर केलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट (मुंबई), शिवाजी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नर्सी मोंजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीजचा समावेश आहे. विशेष म्हणजे, संबंधित विद्यापीठांच्या यादीमध्ये मुंबई, पुणे विद्यापीठाचा समावेश नाही.(प्रतिनिधी)
शिवाजी विद्यापीठ राज्यात अव्वल
By admin | Published: April 05, 2016 1:18 AM