कोल्हापूर : अव्वल साखळी फेरीतील सर्व सामने जिंकत यजमान शिवाजी विद्यापीठाने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद शुक्रवारी पटकविले. या संघाने सर्वाधिक सहा गुणांची कमाई केली.चार गुणांसह मुंबई विद्यापीठ उपविजेते ठरले. दोन गुणांवर असणाऱ्या औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळविला. चौथ्या स्थानी राजस्थानचे कोटा विद्यापीठ राहिले. हे संघ केआयआयटी, भुवनेश्वर येथे दि. २६ डिसेंबरपासून होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरले.असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजने या वर्षी शिवाजी विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष कबड्डी स्पर्धा घेतली. गेल्या चार दिवसांपासून रंगलेल्या या स्पर्धेचा शुक्रवारी समारोप झाला. स्पर्धेतील विजेत्या संघांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे त्यांना विजेतेपदाचे चषक देण्यात आले. या संघटनेचे संभाजी पाटील, रमेश भेंडीगिरी, उमा भेंडीगिरी, बाबासाहेब उलपे, अण्णासाहेब गावडे, अजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत ६८ संघ सहभागी झाले होते. त्यांच्यात पहिल्यांदा बाद फेरीतील लढत झाली. त्यातून अव्वल साखळी फेरीत प्रवेश केलेल्या शिवाजी विद्यापीठ, मुंबई, औरंगाबाद आणि कोटा विद्यापीठांत मानांकनासाठी लढती झाली. त्यात सर्व सामने जिंकून शिवाजी विद्यापीठ अव्वल स्थानी राहिले. त्यापाठोपाठ मुंबई, औरंगाबाद आणि कोटा विद्यापीठ राहिले.
या चारीही विद्यापीठांच्या संघांना पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम विभागीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी साखळी फेरीतील पहिला सामना शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठात झाला.
शेवटची चार मिनिटे बाकी असताना पंचांनी दिलेला निर्णय अमान्य करीत मुंबई विद्यापीठाने सामना सोडला. अखेर शिवाजी विद्यापीठाला पंचांनी २९-२१ अशा गुणांनी विजयी घोषित केले. अत्यंत चुरशीने झालेल्या दुसऱ्या सामन्यात औरंगबाद विद्यापीठाने कोटा विद्यापीठावर ३९-३८ अशा गुणांनी निसटता विजय मिळविला.
मुंबईचा संघसुशांत साहील, अक्षय गोंजारे, सनी होगाडे, ओंकार मोरे, आकाश आडसूळ, आकाश गायकवाड, राहुल शिरोडकर, रोहित जाधव, हृषिकेश कणेरकर, सुरेंद्र कडलगे, अनिरुद्ध मेहर, सिद्धान्त बोरकर, प्रशिक्षक यशवंत पाष्टे, व्यवस्थापक सूर्यकांत ठाकूर.
औरंगाबादचा संघजावेदखान पठाण, शंकर काळे, ओंकार सोनावणे, महारुद्र गर्जे, हनुमंत गर्जे, आदित्य शिंदे, आकाशा पिकलगुंडे, प्रदीप आकनगिरे, आकाश गव्हाणे, विशाल घनगाव, प्रशिक्षक डॉ. वसंत झेंडे, व्यवस्थापक माणिक राठोड, जनरल मॅनेजर बापूसाहेब धोंडे.