कोल्हापूर : उर्दूतील शेरो-शायरी, सूर-तालाच्या साथीने रंगलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेत यजमान शिवाजी विद्यापीठाच्या संघाने सलग दुसºयावर्षी विजेतेपद पटकाविले. मुंबई विद्यापीठाचा संघ सहविजेता ठरला. उत्साही वातावरणात शिवाजी विद्यापीठात मंगळवारी ‘जश्न-ए-कव्वाली’ या स्पर्धेचा समारोप झाला.येथील विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषाभवन सभागृहात मंगळवारी सायंकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, परीक्षक रियाज खान प्रमुख उपस्थित होते. रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक रोहतकच्या (हरियाणा) महर्षी दयानंद विद्यापीठ, फगवाडाच्या (पंजाब) लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, राजस्थानच्या बनस्थळी विद्यापीठाला विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक सागर (मध्यप्रदेश) येथील डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ, अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठ आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला विभागून देण्यात आला. बक्षीस वितरणानंतर विजेत्या संघांतील कलाकार आणि त्यांच्या समर्थकांनी सभागृहातच नृत्याचा फेर धरत जल्लोष केला. दरम्यान, या स्पर्धेत गेल्यावर्षी शिवाजी विद्यापीठाने प्रथम, तर मुंबई विद्यापीठाने द्वितीय क्रमांक मिळविला होता.
राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:29 AM