कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५७वा वर्धापनदिन सोमवारी (दि. १८) साजरा होणार आहे. त्यासाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले प्रमुख उपस्थित असणार आहेत.या दिवशी सकाळी साडेआठ ८.३० वाजता ध्वजवंदन होईल. त्यानंतर पावणेनऊ वाजता विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात सत्कार आणि विविध पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात विद्यापीठातील गुणवंत शिक्षक व प्रशासकीय सेवक, संलग्न महाविद्यालयातील गुणवंत प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि शिक्षक, सेवकांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार केला जाणार आहे.
बॅरिस्टर पी. जी. पाटील आदर्श शिक्षक, प्राचार्या सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका, प्रशासकीय गुणवत्ता अभियान आणि उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कारांचे वितरण प्रमुख उपस्थितांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित असणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.