कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ३९ वा मध्यवर्ती युवा महोत्सव यावर्षी फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात रंगणार आहे. दि. २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे. मध्यवर्ती आणि जिल्हास्तरीय महोत्सवाचे वेळापत्रक विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे निश्चित करण्यात आले असून, ते संकेतस्थळावर बुधवारी प्रसिद्ध केले.युवामहोत्सव द्विस्तरीय पद्धतीने होणार आहे. यावर्षी जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धा आयोजित केल्या आहेत. जिल्हास्तरीय महोत्सव दि. १८ सप्टेंबरपासून घेण्यात येणार आहेत. एकांकिका, लोकनृत्य, लोककला, वाद्यवृंद, लघुनाटिका, पथनाट्य, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, मूकनाट्य, वादविवाद या स्पर्धा जिल्हास्तरीय युवा महोत्सवात होतील.
या स्पर्धांसह शास्त्रीय नृत्य, व्यंगचित्र, भित्तिचित्र, कोलाज, मातीकाम, रांगोळी, स्थळचित्रण, छायाचित्रण, शास्त्रीय गायन, सुगम गायन, पाश्चिमात्य एकल गायन, पाश्चिमात्य समूहगीत, भारतीय समूहगीत, नकला, एकपात्री, शास्त्रीय सूरवाद्य, तालवाद्य, मेहंदी या स्पर्धा मध्यवर्ती महोत्सवामध्ये होणार आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरीय महोत्सव होईल. त्यातील विविध स्पर्धांमधील पहिल्या तीन क्रमांकांचे विजेते मध्यवर्ती महोत्सवात सहभागी होणार आहेत.
जिल्हा पातळीवरील महोत्सवात विविध कलाप्रकारांतील १४ आणि मध्यवर्ती महोत्सवामध्ये ३२ स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये सुमारे ९०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होतात. महोत्सवाचे वेळापत्रक संलग्नित सर्व महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे. महाविद्यालयांनी महोत्सवासाठीच्या प्रवेशिका तीन प्रतींमध्ये योग्य शुल्कासह विद्यार्थी विकास मंडळाकडे पाठविण्याची मुदत दि. ९ सप्टेंबरपर्यंत आहे, अशी माहिती विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी दिली.
जिल्हास्तरीय महोत्सव होणार असा
- कोल्हापूर : डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग जयसिंगपूर (दि. १८ सप्टेंबर)
- सांगली : वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द (दि. २० सप्टेंबर)
- सातारा : प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर (दि. २२ सप्टेंबर)