कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. एस. डी. डेळेकर आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी प्रा. शामकुमार देशमुख यांनी ‘अँटिमायक्रोबियल रंगाकरिता नॅनो संमिश्र’ याबाबत संशोधन केले. त्यांना या संशोधनाकरिता भारतीय पेटंट मिळाले आहे. या रंगाच्या वापरातून सूक्ष्म जीवजंतूचा प्रसार रोखता येणार आहे.मानवाच्या दैनंदिन जीवनात विषाणू, बुरशी, आदी सूक्ष्मजीवजंतू सर्वत्र आढळतात. पोषक वातावरणात ते त्वरित पुनरुत्पादित होतात. त्यामुळे वातावरणात दुर्गंधी, अस्वच्छता पसरते. हे सूक्ष्मजीवजंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करुन अनेक संसर्गजन्य आजार होतात. त्याचसोबत या सूक्ष्मजीवजंतूच्या प्रसारामुळे अनेकवेळा रुग्ण दवाखान्यामध्ये एका आजारासाठी प्रवेश घेतो.परंतु काही वेळा तो सूक्ष्मजीवजंतूच्या संसर्गजन्य आजारामुळे दगावतो. किंबहूना मधुमेही, बीपी रुग्णांना अशा सूक्ष्मजीवजंतूचा संसर्ग लवकर होऊन त्यांची प्रतिकार क्षमता दिवसेंदिवस कमी होत असते. कोरोना विषाणूमुळे होणारे विविध संसर्गजन्य आजाराची प्रचिती सारे जग अनुभवत आहे. त्यामुळेच या सूक्ष्मजीवजंतूचा पृष्ठभागावरील होणारा प्रसार व पुनरुत्पादन रोखण्यासाठी प्रा. डेळेकर आणि देशमुख यांनी अँटिमायक्रोबियल रंगाकरिता आवश्यक नॅनो संमिश्र यांच्या संशोधनातून तयार केली आहेत. अशा रंगाचे आवरण घरातील व दवाखानातील विविध वस्तूना दिल्यास त्या वस्तूंच्या पृष्ठभागावरील सूक्ष्मजीवजंतू नष्ट होऊन त्यांचा प्रसारही होत नाही. त्यामुळेच विविध संसर्गजन्य आजाराचा अटकाव होवू शकतो. हा रंग हा घरातील, कार्यालयातील, दवाखान्यातील विविध उपकरणे, कॉट, दरवाजे, कपाटे, टेबल, खुर्ची, आदींसाठी वापरू शकतो. वाहनांच्या पत्र्यांना या रंगाचे आवरण दिल्यास ते पृष्ठभागही जंतुविरहीत होवू शकतात.
आम्ही संशोधित केलेले नॅनो संमिश्रे ही दीर्घकालीन अँटिमायक्रोबियल गुणधर्म असलेले पदार्थ असून ते पूर्ण सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहेत. या संशोधनाचे श्रेय शिवाजी विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांचे आहे. या संशोधनाला गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने पेटंट दिले आहे. -प्रा. एस. डी. डेळेकर