या बैठकीत बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बीबीए., बीसीए., बीसीएस आदी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाला. त्याबाबतची शिफारस या समितीने विद्यापीठ प्रशासनाला केली. यापूर्वी विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांनी दि. २२ मार्च ते २२ एप्रिलदरम्यान प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन अथवा ऑफलाइन स्वरूपात घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार दि. ५ एप्रिलपासून परीक्षा घेण्याची बहुतांश महाविद्यालयांनी तयारी केली होती. मात्र, परीक्षा नियोजन समितीच्या निर्णयामुळे या महाविद्यालयांना त्यामध्ये बदल करावा लागणार आहे. ऑनलाइन स्वरूपात परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालयांनी त्यांच्या पातळीवर संगणक प्रणाली निवडायची आहे. त्यामुळे साधारणत: दि. ३ मेपासून प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू होण्याची शक्यता आहे. या ऑनलाइन बैठकीस डॉ. गुळवणी, एच. एन. मोरे, आर. व्ही. शेजवळ, प्राचार्य संघटनेचे सचिव डॉ. व्ही. एम. पाटील, आर. जी. कुलकर्णी, एम. बी. वाघमारे, सारंग भोला, डी. एन. काशिद आदी उपस्थित होते. दरम्यान, उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी विद्यापीठाच्या परीक्षांचा आढावा सादर केला. विद्यापीठात १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांची एकूण संख्या २ लाख ५७ हजार असल्याची माहिती त्यांनी दिली. हिवाळी सत्रातील द्वितीय वर्षातील विविध २६ अभ्यासक्रमांची २९५६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
चौकट
प्रवेश परीक्षाही ऑनलाइन
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रथम वर्षाच्या परीक्षा आणि एम. फिल., पीएच.डी. च्या प्रवेश परीक्षा ऑनलाइन घेण्याची शिफारस आमच्या समितीने विद्यापीठाला केली आहे. प्रवेश परीक्षा या देखरेखीमध्ये घेण्यात याव्यात, असे विद्यापीठाला सुचविले असल्याची माहिती डॉ. मेघा गुळवणी यांनी दिली.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
संलग्नित महाविद्यालये : २७६
प्रथम वर्ष विद्यार्थी संख्या : ६२८००
एम. फिल., पीएच.डी. प्रवेश परीक्षा विद्यार्थी संख्या : ५५०