संतोष मिठारी --कोल्हापूर -अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न, चुकीच्या सत्रातील प्रश्नपत्रिकांचे वितरण, प्रवेशपत्रांवर पेपरच्या वेळेची चुकीची नोंद अशा स्वरुपात शिवाजी विद्यापीठाचा परीक्षा कालावधीत ‘गोंधळ’ सुरू आहे. कधी परीक्षा केंद्र, कधी प्रश्ननियोजक, तर कधी विद्यापीठातील परीक्षा विभाग यांच्या चुकीचा, एकमेकांमधील असमन्वयाचा फटका परीक्षार्थींना बसत आहे.प्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यापीठ हिवाळी व उन्हाळी सत्रात पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविकांच्या ११६८ परीक्षा घेते. त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, विधी, आदी नऊ विद्याशाखांतील १८६ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. सुमारे पावणेसहा लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी या परीक्षा देतात. दुसऱ्या सत्रातील परीक्षा २४ मार्चपासून सुरू झाल्या आहेत. प्रश्नपत्रिकांच्या वितरणासाठी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून सिक्युर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी (एसआरपीडी, गोपनीय व नियंत्रित पद्धतीने प्रश्नपत्रिका वितरण) या प्रणालींचा वापर केला जातो. याबाबत परीक्षा विषयक काम करणाऱ्या महाविद्यालय, विद्यापीठ पातळीवरील घटकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आहेत. पेपरफुटीसारखे प्रकार ‘एसआरपीडी’च्या वापरामुळे घडलेले नाहीत. ही परीक्षा मंडळाची जमेची आणि चांगली बाजू आहे. मात्र, तंत्रज्ञानाऐवजी ज्याठिकाणी प्रत्यक्ष व्यक्तींद्वारे काम होणाऱ्या टप्प्यावर परीक्षा मंडळाची यंत्रणा गडबडून जात आहे. त्यात ‘एसआरपीडी’द्वारे प्रश्नपत्रिकांचे वितरण आणि प्रश्ननियोजकाकडून प्रश्नपत्रिका तयार करणे, ती गोपनियतेसाठी पाकीटबंद करणे या टप्प्यांवर होणाऱ्या चुकांचा अधिकतर समावेश आहे. या चुकांचा नाहक त्रास हा वर्षभर अभ्यास करून परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सहन करावा लागत आहे. परीक्षेच्या कालावधीत परीक्षार्थी हे काहीसे तणावाखाली असतात. ऐनपेपरच्या वेळी तो चुकीचा अथवा उशिरा मिळणे असे प्रकार घडल्यास परीक्षार्थी गोंधळून जातात. त्याचा परिणाम त्यांच्या पेपरच्या लेखनावर होण्याची शक्यता असते. ते लक्षात घेऊन विद्यापीठाने परीक्षांच्या कालावधीतील हा गोंधळ कायमचा संपविण्यासाठी तातडीने पाऊल उचलणे आवश्यक आहे.याचा विचार करावापरीक्षेत आजअखेर घडलेले प्रकार३ नोव्हेंबर २०१६ : कोल्हापुरातील एका केंद्रावर बीबीए अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्रातील ‘संख्याशास्त्रा’च्या विद्यार्थ्यांना दोन तास उशिरा पेपरचे वितरण. २९ नोव्हेंबर २०१६ : बी. कॉम. (पाचवे सत्र) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या ‘बिझनेस एन्व्हायर्न्मेंट’ पेपरच्या वेळीची प्रवेशपत्रावर चुकीची छपाई.३१ मार्च २०१७ : बी. ए. भाग तीनच्या सहाव्या सत्रातील समाजशास्त्र या अभ्यासक्रमाच्या पेपर क्रमांक १६ करिता पाचव्या सत्रातील अभ्यासक्रमांवरील प्रश्नपत्रिकेची छपाई झाल्याने पेपर रद्द.११ एप्रिल २०१७ : बी. एस्सी. भाग तीनच्या प्राणीशास्त्र विषयाच्या पेपर क्रमांक १३ आणि १४ मध्ये तीन वर्षांपूर्वीच्या अभ्यासक्रमांवरील प्रश्न विचारण्याचा प्रकार. २६ एप्रिल २०१७ : ‘एम. कॉम. भाग एक’ पुनर्रपरीक्षार्थींच्या ‘मॅनेजमेंट कन्स्पेट अॅण्ड आॅर्गनायझेशनल बिहेव्हिअर’ या विषयाचा दुसऱ्या सत्रातील पेपरवेळी पहिल्या सत्रातील प्रश्नपत्रिकांचे वितरण. 1‘नॅक’ चे मानांकन असो की, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, आॅल इंडिया सर्व्हे आॅन हायर एज्युकेशन, नेचर पब्लिकेशन ग्रुपच्या ई-जर्नल वापराचे सर्वेक्षण यामध्ये अव्वल स्थानी राहून आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाने गुणवत्ता सिद्ध केली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या ‘गोंधळा’ने विद्यार्थ्यांना फटका
By admin | Published: April 28, 2017 1:08 AM