या मूल्यांकनाच्या प्रक्रियेसाठी प्रा. जे. पी. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समिती सोमवारी सकाळी नऊ वाजता विद्यापीठात दाखल झाली. प्रा. शर्मा यांच्यासह प्रा. बी. आर. कौशल, एस. ए. एच. मोईनुद्दिन, तरुण अरोरा, सुनील कुमार, हरिश चंद्रा दास यांचे स्वागत कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून समितीच्या सदस्यांनी अभिवादन केले. त्यानंतर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या वाटचालीविषयीचे सादरीकरण केले. त्यानंतर समितीने विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिविभागप्रमुख, प्राध्यापक, संशोधक यांच्यासमवेत चर्चा केली. त्यानंतर समिती सदस्यांनी आपल्यातील प्रत्येकी दोन सदस्यांचे तीन गट करून अधिविभागांची पाहणी सुरू केली. रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, बायोकेमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, मराठी, संगीत व नाट्यशास्त्र, लॉ, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागांची पाहणी केली. दुपारच्या सत्रात परीक्षा व मूल्यमापन मंडळ, आयसीटी कक्ष यांच्यासह निवडक विभाग प्रमुखांशी चर्चा केली. सीएफसी, लीड बॉटेनिकल गार्डनची पाहणी केली. विद्यार्थी विकास विभाग आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समितीसमोर सायंकाळी वि. स. खांडेकर भाषाभवनमध्ये विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रंगला.
चौकट
अभ्यासक्रमातील बदल, कामगिरीबद्दल विचारणा
या समिती सदस्यांनी अभ्यासक्रम कसा बदलता, त्यासाठी कोणते निकष वापरता, आदींची माहिती अभ्यासमंडळांच्या अध्यक्षांकडून घेतली. अधिविभागांमध्ये समितीसमोर तेथील प्रमुखांनी सादरीकरण केल्यानंतर गेल्या पाच वर्षांतील विभागातील संशोधन, वेगळी कामगिरी, मिळालेले पुरस्कार, पीएच.डी. आणि एम. फिल झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या, आदींबाबत समिती सदस्यांकडून विचारणा केली जात होती. त्याबाबतच्या काही कागदपत्रांची तपासणी करण्यात येत होती.
चौकट
माजी विद्यार्थ्यांशी आज संवाद
समिती आज, मंगळवारी सकाळच्या सत्रात संगणक केंद्र, ग्रंथालय आदींना भेट देणार आहे. दुपारी तीन ते चार यावेळेत माजी विद्यार्थी, पालक यांच्याशी, तर सायंकाळी विविध अधिकार मंडळांतील सदस्यांशी संवाद साधणार आहे.