मार्च-एप्रिल २०२० दरम्यान कोअर टीमने (समिती) विद्यापीठाला भेट देऊन, पाहणी करून मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोनामुळे ही प्रक्रिया लांबली. त्यावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नॅक समितीने विद्यापीठाच्या मूल्यांकनासाठी मार्चमधील तारखा दिल्या. त्यानंतर विद्यापीठाची या मूल्यांकनासाठीच्या तयारी सुरू झाली. प्रशासन, शैक्षणिक, अशा विविध १५ समितींच्या माध्यमातून तयारी करण्यात येत आहे. ‘डीव्हीव्ही’चा (डेटा व्हॅलिडिटेशन अँड व्हेरिफिकेशन) अभ्यासक्रम, अध्ययन व अध्यापन, संशोधन आणि समाजाभिमुख भूमिका, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना पाठबळ, प्रशासन, उपक्रम व योजना, वेगळेपण या विविध निकषांनुसार विद्यापीठाची विश्लेषणात्मक, संख्यात्मक माहिती ‘नॅक’ला सादर झाली आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक आणि विविध ३४ अधिविभागांच्या सादरीकरणाचा अहवाल तयार झाला आहे. विद्यापीठ परिसराची स्वच्छता, काही इमारतींच्या रंगरंगोटीचे काम वेगाने सुरू आहे. संख्यात्मक आणि विश्लेषणात्मक अशा दोन टप्प्यांमध्ये नॅक मूल्यांकन होणार आहे. त्यातील ७० टक्के असलेल्या संख्यात्मक माहितीची पडताळणी ‘नॅक’कडून झाली आहे. उर्वरित ३० टक्के विश्लेषणात्मक मूल्यांकनासाठी समिती विद्यापीठाला भेट देणार आहे.
प्रतिक्रिया
विद्यापीठाच्या ‘नॅक’ मूल्यांकनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी जय्यत तयारी केली आहे. त्याच्या जोरावर विद्यापीठाला या मूल्यांकनात चांगली श्रेणी मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.
-डॉ. एम. एस. देशमुख, संचालक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष