कोल्हापूर : कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षातील परीक्षा आज (गुरूवार)पासून ऑनलाईन स्वरूपात सुरू होणार आहेत. या परीक्षांच्या पहिल्या दिवशी विविध विषयांचे सुमारे १५० पेपर होणार आहेत. दिवसभरात चार सत्रांमध्ये ही परीक्षा होईल.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यापीठाने दिनांक ६ ते १२ एप्रिल दरम्यानच्या परीक्षा स्थगित केल्या. या कालावधीतील पेपर संबंधित अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या अखेरीस आणि दिनांक १५ एप्रिलपासून सर्व परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. त्यादृष्टीने विद्यापीठातील अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांना सूचना केली. बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बीबीए., बीसीए., एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी, आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षा गुरूवारपासून ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. दिवसभरात सकाळी साडेदहा ते साडेअकरा, दुपारी साडेबारा ते दीड, दुपारी अडीच ते साडेतीन, दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेपाच या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा क्लस्टर महाविद्यालयांतर्फे ऑनलाईन होतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी बुधवारी दिली.
चौकट
‘ऑफलाईन’ १७ हजार विद्यार्थी
ऑफलाईन परीक्षा देण्याचा पर्याय सुमारे ५२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदवला होता. या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडावा, असे आवाहन विद्यापीठाने केले. त्यावर ३५ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पर्याय निवडला, तर १७ हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा देण्याचा पर्याय कायम ठेवला आहे. या ऑफलाईन विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घेण्यात येणार आहे.
चौकट
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन, वॉररूम
ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना काही माहिती हवी असल्यास ती देण्यासाठी आणि तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास ती सोडविण्यासाठी परीक्षा मंडळाने हेल्पलाईन आणि विद्यापीठात वॉररूम सुरू केली असल्याची माहिती पळसे यांनी दिली.
ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप
वेळ : एक तास
पेपरमधील प्रश्न : २५ (एमसीक्यू स्वरूपातील)
गुण : ५०