कोल्हापूर : एकीकडे परीक्षांबाबत सेमीस्टर (सत्र पद्धती) बंद करून वार्षिक पद्धती लागू करण्याची अधिसभेने केलेली शिफारस आणि दुसरीकडे कुलपतींसमवेतच्या बैठकीत सेमीस्टर कायम ठेवण्याबाबत झालेला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाबाबतचा सेमीस्टरचा मुद्दा पेचात सापडणार असल्याचे दिसते.सेमीस्टरमुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांना वर्षातून दोनवेळा परीक्षांचे कामकाज करावे लागत आहे. शिक्षक, विद्यार्थी यांचा अधिकतर वेळ परीक्षांमध्ये व्यतित होत आहे. कला, वाणिज्य परीक्षांमध्ये सेमीस्टर पद्धतीमुळे सर्व विद्यार्थी व महाविद्यालये शिक्षणार्थीऐवजी परीक्षार्थी झाली आहेत. त्यामुळे या विद्याशाखांची सेमीस्टर बंद करावी, याबाबतचा ठराव दि. २७ मार्चला अधिसभेने एकमताने मंजूर झाला.
या ठरावाद्वारे अधिसभेने सेमीस्टर बंद करावी, अशी शिफारस परीक्षा व मूल्यमापन मंडळाला केली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी मुंबईत कुलपती सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या बैठकीत सेमीस्टर पद्धती कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेने केलेला ठराव आता अधिष्ठाता मंडळ, परीक्षा व मूल्यमापन मंडळानंतर विद्या परिषदेसमोर सादर होईल. या मंडळांच्या निर्णयानुसार सेमीस्टर बंद करायची की, सुरू ठेवायची याबाबतची कार्यवाही होणार आहे.
विद्यापीठ कायद्यानुसार या मंडळांना कामकाज करणे, निर्णय घेण्याबाबत अधिकार आहेत. त्यामुळे सेमीस्टर बंदबाबत या मंडळांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास त्याची अंमलबजावणी करायची की, सर्व कुलगुरूंच्या बैठकीतील निर्णयानुसार कार्यवाही करायची, असा पेच विद्यापीठासमोर निर्माण होणार आहे.
मुंबईमध्ये सर्व कुलगुरूंच्या बैठकीत सेमीस्टर पद्धती कायम ठेवण्याबाबत निर्णय झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) सूचनेनुसार सेमीस्टर पद्धतीबाबत विद्यापीठाला कार्यवाही करणे आवश्यक आहे. सेमीस्टर बंद करण्याबाबत अधिसभेने पुढील अधिकार मंडळांना शिफारस केली आहे. याअनुषंगाने पुढील निर्णय संबंधित अधिकार मंडळांमध्ये घेतला जाईल.-डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ