संतोष मिठारी ल्ल कोल्हापूर कॅम्पस्वरील शैक्षणिक, संशोधन, आदी क्षेत्रांतील घटना, कामगिरीची माहिती जगभरात जावी, या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाने सोशल मीडियाच्या वापराच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यात विद्यापीठाने युनिशिवसंदेश ब्लॉग, एसयुके-इन न्यूजची सुरुवात केली आहे. शिवाय गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले ई-बुलेटिन ‘शिवसंदेश’ हे अद्ययावत करून त्याचे पुनरुज्जीवन केले आहे. विद्यापीठाने गेल्या दीड वर्षापूर्वी संकेतस्थळ अद्ययावत केले; पण विद्यापीठाचे ‘शिवसंदेश’ हे ई-बुलेटिन अद्ययावत केले नव्हते. कॅम्पसमधील शैक्षणिक, संशोधन, प्रशासकीय विभाग, आदी क्षेत्रांतील घटना, कामगिरीची माहिती देण्यासाठी दर महिन्याला प्रसिद्ध होणारे इंग्रजी माध्यमातील ‘शिवसंदेश’ २००५ मध्ये सुरू केले. मात्र, ई-बुलेटिनच्या कामाबाबतची समन्वय समितीच्या कामकाजाची पद्धती, विद्यापीठ विविध अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांची उदासीनता ‘शिवसंदेश’च्या नियमित अद्ययावतीकरणाला अडथळा ठरली. प्रशासनाने शिवसंदेश अद्ययावत करण्यासाठी संपादकीय मंडळ बदलले. या नव्या मंडळाने जानेवारी व फेब्रुवारी २०१६ चा अंक अद्ययावत केला आहे. ई-बुलेटिनसह अन्य सोशल मीडियाच्या वापराच्या दिशेने विद्यापीठाचे पाऊल पडले. यात जनसंपर्क कक्षाला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शिवसंदेश ब्लॉग १ मार्चपासून सुरू केला आहे. याद्वारे विद्यापीठातील विविध उपक्रम, कार्यक्रमांची माहिती मराठीतून दिली जाते. यात विद्यार्थ्यांसह समाजातील विविध घटकांना विद्यापीठाबाबतच्या आपल्या सूचना, मते मांडता येणार आहेत. विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये दक्षिण कोरियाचा दौरा केला. येथे शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील घडामोडींची माहिती देणारी लिंक विकसित करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार ‘एसयुके-इन न्यूज’ ही लिंक विकसित केली आहे. यात कोल्हापुरातील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या विद्यापीठाशी संबंधित बातम्यांची कात्रणे स्कॅनिंग करून अपलोड केली जातात. त्यामुळे परदेशातील विद्यार्थ्यांपर्यंत विद्यापीठातील उपक्रम, कार्यक्रमांची माहिती मराठीतून रोज पोहोचत आहे. आॅनलाईन व सोशल मीडियाचा वापर करून इंग्लिश आणि मराठीतून विविध उपक्रम, घडामोडींची माहिती जगभरात पोहोचविण्याचा प्रयत्न विद्यापीठाला नवी ओळख देत आहे. फेसबुक पेज सुरू करण्याचा विचार शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी जगभरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना विद्यापीठातील उपक्रम, घडामोडींची माहिती मिळावी, यासाठी ई-बुलेटिन, ब्लॉग व एसयुके-इन न्यूजची सुरुवात केली असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, या उपक्रमाद्वारे विद्यापीठाने सोशल मीडियाच्या वापराच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ब्लॉगद्वारे विद्यार्थी, समाजातील विविध घटकांना विद्यापीठाशी संवाद साधता येईल. विद्यापीठाचे अधिकृत फेसबुक पेज सुरू करण्याचा विचार सुरू आहे.
शिवाजी विद्यापीठाचे ‘सोशल’ पाऊल
By admin | Published: April 04, 2016 12:10 AM