कोल्हापूर : हायमास्ट दिवे बसविल्याने अखेर दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शिवाजी विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उजळला आहे; त्यामुळे पहाटे लवकर आणि सायंकाळी उशिरापर्यंत सराव करण्यास वेळ मिळणार असल्याने खेळाडूंतून समाधान व्यक्त होत आहे.
लाखो रुपये खर्च करून साकारलेला विद्यापीठातील सिंथेटिक ट्रॅक गेल्या दोन महिन्यांपासून होता; त्यामुळे पहाटे आणि सायंकाळी सराव करता येत नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजी होती. विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ट्रॅकची सुरक्षितता धोक्यात आली असून, खेळाडूंची गैरसोय झाली असल्याचे ‘लोकमत’ने दि. २१ जानेवारीच्या अंकात ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रॅक अंधारात’ या वृत्तातून मांडले होते. ट्रॅक परिसरातील पहारा देणाऱ्या सुरक्षारक्षकांची झालेली अडचण आणि संबंधित हायमास्ट दिवे बसविण्याबाबत वारंवार मागणी करूनदेखील विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्षच असल्याची खेळाडूंची असलेली तक्रार याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर प्रशासनाकडून कार्यवाही होऊन या ट्रॅकवरील खांबावर हायमास्ट दिवे बसविण्यात आले.
दरम्यान, याबाबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सांगितले, ट्रॅक परिसरात करण्यात आलेल्या खोदाईच्या कामामुळे तेथील वीज पुरवठा करणे शक्य होत नव्हते. हायमास्ट दिवे बसविण्यासह वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम झाले आहे.