गडहिंग्लज : ऊसाच्या शेतात तणनाशक मारत असताना विषारी सापाने दंश केल्यामुळे शेतमजुराचा दुर्देवी मृत्यू झाला. शिवाजी भरमू कांबळे (वय ४०, रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. त्याच्या अकाली निधनामुळे इंचनाळसह पंचक्रोशी हळहळली.पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, जमीन अत्यल्प असल्यामुळे शिवाजी हा शेतमजुरीची कामे करीत होता. विशेषत: तणनाशक व कीटकनाशके फवारण्याच्या कामात तो तरबेज होता. अत्यंत प्रामाणिक व होतकरू असल्यामुळे अनेक शेतकरी त्याला बोलवून हे काम देत असत.रविवार (१८) रोजी तो इंचनाळ येथील नाईक यांच्या ऊसाच्या शेतात तणनाशक फवारणीच्या कामासाठी गेला होता. औषध फवारणी करीत असताना त्याला विषारी सापाने दंश केल्यामुळे तो सरीतच कोसळला होता.दरम्यान, बराच वेळ झाला तरी तो परत न आल्यामुळे शोधाशोध केली असता तो ऊसाच्या सरीत बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळून आले. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी एका धर्मादाय रूग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
उत्तरीय तपासणीनंतर गावातील थळदेव मंदिरानजीकच्या शेतवडीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. वैद्यकिय अधिक्षक डॉ. बालाजी साळुंखे यांच्या वर्दीवरून या घटनेची गडहिंग्लज पोलिसात नोंद झाली आहे.गरीब कुटुंब उघड्यावरतुटपुंज्या शेतीमुळे शेतमजुरी आणि पडेल ते काम करून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या शिवाजीवर काळाने अकाली झडप घातली. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. अंत्यसंस्कारावेळी त्याची पत्नी व मुलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.