कोल्हापूर : छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन तरुणाईने देशसेवेसाठी पुढे यावे. त्यांनी देशनिष्ठा बळकट करावी, असे आवाहन तंजावरचे प्रिन्स शिवाजीराजे टी. भोसले यांनी येथे केले.शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीतर्फे आयोजित ‘शिवमहोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहातील या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला ‘शिव-जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी पुरस्कार स्वीकारला. मानपत्र, पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ‘शिवमहोत्सवा’चे संकल्पक डॉ. प्रवीण कोडोलीकर, ‘मॉर्डन होमिओपॅथी’चे विजयकुमार माने, आदी प्रमुख उपस्थित होते. शिवमहोत्सवातील हा सन्मान माझा नसून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी केलेल्या कार्याचा असल्याचे प्राचार्य साळुंखे यांनी सांगितले.पी. टी. गायकवाड, अनिल घाटगे, रवींंद्र भणगे, शिवाजी कांबळे, सूरज धनवडे, दत्तात्रय कवाळे, शालन मोरे, नंदिनी पाटील, सुनील कोळी यांना ‘शिवपुरस्कार’, तर सागर अहिवळे, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, प्राचार्य एस. एस. चव्हाण यांना ‘शिव अभिमान’ आणि राजकुमार ढवळे यांना ‘शिवकृषी अभिमान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अण्णासाहेब खेमनर, सुधर्म वाझे, डी. आर. मोरे, व्ही. टी. पाटील, शीतल माने, मंदार पाटील, मंजित माने, चांगदेव बंडगर, आदी उपस्थित होते. सागर बगाडे यांनी प्रास्ताविक केले. सत्यजित कोसंबी यांनी सूत्रसंचालन केले. ऋतुराज माने यांनी आभार मानले.
सांस्कृतिक कार्यक्रम रंगलापुरस्कार वितरणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. त्याची सुरुवात सार्थक भिलारी याच्या शास्त्रीय नृत्याने झाली. पूजा गोटखिंडीकर यांनी ‘अधीर मन झाले’ गीत सादर केले. श्वास अकॅडमीने ‘तान्हाजी’मधील गीतांवरील नृत्याने उपस्थितांना ठेका धरायला लावला. त्यानंतर सँड आर्ट, नृत्यांचे सादरीकरण झाले. त्याला टाळ्या-शिट्ट्यांनी दाद देत तरुणाईने जल्लोष केला.