कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पूलाचे काम युध्दपातळीवर सुरु असताना झालेल्या कामाचे बील देण्यावरुन सुरु असलेल्या मतभेदामुळे शुक्रवारपासून हे काम बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात लक्ष न घातल्यास पुन्हा सर्वपक्षीय आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.पर्यायी शिवाजी पूलाचे उर्वरित ३ कोटींचे काम गेले सद्या युध्दपातळीवर सुरु आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत हा पूल पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच आता अधिकाऱ्यातील मतभेदाचे गृहण लागले आहे. हे काम गोव्याच्या आसमास कन्स्ट्रक्शनच्यावतीने एन. डी. लाड यांनी घेतले आहे. त्यांनी हा पूल फेब्रुवारी अखेरपर्यत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपल्या कामाची गती घेतली आहे.
आतापर्यत या पूलावर सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तर त्याशिवाय पूलाच्या पहिल्या टप्प्यातील मुख्य स्लॅबसाठी लाखो रुपयांची सळई बांधली आहे. निवीदेपेक्षा जादा खर्च या पूलावर केला आहे. निवीदा काढण्यापूर्वी केलेल्या चाचणीत, पूलाचा पाया अपेक्षेपेक्षा खोलवर गेल्याने मुख्य स्लॅबचे डिझायन बदलले, नदी पात्रातील मुरुम काढणे, नदी पात्रापर्यत वाहतुकीसाठी रस्ता निर्मीती खर्चाचा निवीदेमध्ये कोठेही उल्लेख नाही.
पण पूलाचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या साक्षीनेच ही जादा कामे झाली. पण आता सुमारे सव्वा ते दिड कोटी रुपये खर्च करुनही फक्त ९ लाखांचे बील काढण्यास मंजूरी दिल्याने ठेकेदार एन.डी. लाड हे हवालदिल झाले आहेत. त्यांनी प्रसंगी शुक्रवारपासून काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
कृती समितीचा पुन्हा आंदोलनाचा पावित्रापूलाचे काम पुन्हा बंद पडल्यास सर्वपक्षीय कृती समिती पुन्हा आंदोलनाचा पावित्रा घेणार आहे. त्यामुळे पुन्हा कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
एकाच कामाचे तीनवेळा बील बदलठेकेदाराने केलेल्या मागणीनुसार या पूलावरील उपअभियंता संपत आबदार यांनी एकाच कामाचे ६३ लाख रुपये, ९० लाख रुपये व ९ लाख रुपये असे तीनवेळा एकाच आठवड्यात बील काढल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. झालेल्या कामांचे मोजमाप हे ठेकेदार आणि उपअभियंता यांनी नियमानुसार एकत्रीत करणे आवश्यक आहे.