कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्यातून सुटका झाल्याच्या घटनेला ३५५ वर्षें पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून हिलरायडर्स ॲडव्हेंचर्स फाउंडेशनने गरुड झेप मोहिमेंतर्गत शिवज्योत आणण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आग्र्यातून १७ ऑगस्टला निघालेली ही ज्योत रविवारी राजगडावर पोहोचत आहे. तेथून ती सोमवारी कोल्हापुरात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व गडकिल्ल्यांवर ही ज्योत फिरणार असून, यानिमित्ताने शिवरायांच्या शौर्याचा, धैर्याचा इतिहास म्हणून एकदा जागा केला जाणार आहे.
शिवाजी महाराजांनी मोठे कसब वापरत आग्र्यात मुगलांच्या नजरकैदेतून सुटका करून घेतली होती. ते डोंगरदऱ्यांची वाट तुडवत राजगडावर सुखरुप पोहोचले होते. शिवकालीन इतिहासात या घटनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साडेतीनशे वर्षानंतरदेखील या घटनेने अंगावर रोमांच उभा राहतो. नव्या पिढीला ही शौर्यगाथा कळावी, या उद्देशाने इतिहासप्रेमी नवनवीन उपक्रम आखतात. त्याचाच एक भाग म्हणून या शिवज्योतीचे आयोजन केले आहे, अशी माहिती विजय देवणे, प्रमोद पाटील, हृषीकेश केसरकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.
चौकट
१७ ऑगस्टला आग्र्यातून ज्योत निघाली. रोज १५० किलोमीटर पायी प्रवास करत ती उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातील ५८ शहरातील १२०० किलोमीटरचे अंतर पार करत २९ ला राजगडावर पोहोचणार आहे. मारुती गोळे यांच्या नेतृत्वाखाली ही ज्याेत निघाली असून, यात राज्यातील ३० मावळे सहभागी झाले आहेत. यात कोल्हापूरचे सुरज ढोली सहभागी आहेत.
चौकट
सातारा, कराड, पेठनाका, इस्लामपूर, शिरोलीमार्गे सोमवारी सायंकाळी ४ वाजता ही ज्योत कावळा नाका येथे पोहोचेल. तेथे स्वागत होऊन राजाराम महाराज पुतळा, शाहू महाराज पुतळा, शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर मिरवणूक निघणार आहे. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जिल्ह्यातील पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, ताम्रपर्णी या पाच नद्यांचे कलश व ज्योत ठेवलेल्या शिवरथासह जिल्ह्यात रवाना होणार आहे. कागल, निढोरी, मुरगुड, गारगोटी, भूदरगड किल्ला, उत्तूर, गडहिंग्लजमार्गे सामानगडावर शिवज्योत जाईल.
चौकट
पारगडावर सांगता
मंगळवारी दुपारी अडीच वाजता भूदरगड तर ५ वाजता सामानगड येथे शिवज्योतीचे पूजन होणार आहे. बुधवारी ११ वाजता गंधर्वगड व पारगडला अडीच वाजता पूजन होऊन या मोहिमेची सांगता होणार आहे.