लोकमत न्यूज नेटवर्क
पन्हाळा : शिवजयंतीनिमित्त किल्ले पन्हाळागडावरून शिवभक्तांना शिवज्योत नेण्यास पन्हाळा नगराध्यक्षांनी बंदी आदेश काढल्याने शिवजयंती उत्सव सोहळा पूर्वापारप्रमाणे साजरा करण्यासाठी शिवभक्तांतून नाराजी व्यक्त होत आहे. पन्हाळा येथील संभाजी ब्रिगेड यांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगराध्यक्षा यांना निवेदन दिले.
इतर राजकीय, सांस्कृतिक, कार्यक्रम गडावर साजरे केले जात आहेत. मग शिवज्योतीलाच विरोध का? असा प्रश्न शिवभक्तांतून उपस्थित होत आहे. तरी त्यांच्या भावनांचा विचार करून काढलेला बंदी आदेश लवकरात लवकर मागे घेऊन जाहीर करावे, अन्यथा कोरोनामुळे जर हा बंदी आदेश काढलेला असेल तर योग्य नियम घालून नगरपरिषदेने शिवज्योत गडावरून घेऊन जाण्यास परवानगी द्यावी याचा विचार करून नगरपरिषद पन्हाळा यांनी गडावरील शिवज्योतीबाबतचा बंदी आदेश मागे घेण्याबाबत अपेक्षा आहे अन्यथा, संभाजी ब्रिगेड पन्हाळा यांच्या वतीने सर्व शिवभक्तांना शिवज्योत गडावरून घेऊन जाण्यास सहकार्य करेल. त्यावेळी होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.