कोल्हापूर : नृत्य, गायन अशा कलागुणांच्या उधळणीत रविवारी शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीतर्फे आयोजित शिवमहोत्सव रंगला. त्यात समितीतर्फे विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांना नागरबाई शिंदे यांच्या हस्ते ‘शिवजीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यापीठातील सात प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या लोककला केंद्रातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, तर विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, चाटे शिक्षण समूहाचे कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. भारत खराटे, ‘मनसे’चे मंदार पाटील प्रमुख उपस्थित होते. प्रा. आर. जी. दंडगे, व्ही. एल. अंत्रेडी, विजय फुलारी, अरुण वणिरे, शंकर कोगले, धैर्यशील यादव, अरविंद पोवार यांना शिवपुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिवमहोत्सवाचे संकल्पक डॉ. प्रवीण कोडोलीकर, अध्यक्ष डॉ. चांगदेव बंडगर, सागर बगाडे, संजय मोहिते, सागर चव्हाण, आदी उपस्थित होते. डॉ. सरोज बिडकर यांनी प्रास्ताविक केले. सत्यजित कोसंबी यांनी सूत्रसंचालन केले. अनंत पाटील यांनी आभार मानले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. श्वास अकॅडमीने शिवचरित्र सादर केले. हेल्पर्स अॅन्ड हॅण्डीकॅपच्या विद्यार्थ्यांनी ‘जश्न हे जितका’, अवनि संस्थेच्या ‘तारे जमीं पर’ नृत्य सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली. सार्थक क्रिएशन्स्च्या ‘शिवस्तुती’ नृत्य, कोणार्क शर्मा, वेदांती सोनुले, वैदेही जाधव, कबीर यांच्या गायनाने कार्यक्रमांत रंग भरला. लघुपट महोत्सवातून प्रबोधन शिवमहोत्सवात सकाळी कोल्हापुरातील लघुपटांचा महोत्सव झाला. त्याचे उद्घाटन प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते कवी डॉ. राज होळकर यांच्या उपस्थितीत झाले. त्याची सुरुवात हेल्पिंग हँडने (महेशकुमार सरतापे) झाली. त्यानंतर फेटा, गूळ, साज, चप्पल या कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची निर्मिती दाखविणारे इन्स्पिरेशन आॅफ कोल्हापूर (प्रसाद महेकर), युवकांना जबाबदारीची जाणीव करून देणारा व्हेकेशन (अनुप बेलवलकर), वाहतुकीतील स्वयंशिस्तीचे महत्त्व सांगणारे ट्रॅफिक (स्नेहलराज संकपाळ), एक क्षण (अजय खाडे), विकारवशता सोडण्याचा संदेश देणारे विसर्जन (उमेश बगाडे) यांचे सादरीकरण झाले. कोलाज (साईप्रसाद पोतदार) मधून पर्यावरण रक्षण, आर्म थीपद्वारे (प्रशांत सुतार) व्याघ्र संवर्धनाचा संदेश दिला. त्यानंतर आशा (चैतन्य डोंगरे), ह्युमॅनिटी (नीलेश बोडके), प्रतीक्षा (अमृता पाटील), ए डार्क क्लाऊडी डे (किरण चव्हाण), चिनू (विक्रम शिंदे) यांचे सादरीकरण झाले. ‘दहशतवाद’ने लघुपटाने महोत्सवाचा समारोप झाला. शुभम चेचरच्या ‘गुमस्ता’ व सागर ढेकणेच्या ‘माझे आधारकार्ड’चा प्रीमिअर शो झाला. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
कलागुणांच्या उधळणीत रंगला ‘शिवमहोत्सव’
By admin | Published: February 22, 2016 12:59 AM