कोल्हापूर : राज्यशासनाने गरीब व गरजू व्यक्तींना केवळ १0 रुपयांत जेवण देणारी ‘शिवभोजन थाळी’ योजना जाहीर केली आहे. कोल्हापुरात २६ जानेवारी रोजी याची सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. ६00 थाळींचे उद्दिष्ट देण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात शहरामध्ये चार ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा पदभार घेतल्यानंतर महात्मा जोतिराव फुले कृषी कर्ज माफी योजनेसोबत गरिबांसाठी अनुदानावर केवळ १0 रुपयांत जेवण देणारी ‘शिवभोजन थाळी’ योजना जाहीर केली. या दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीचे आदेशही त्यांनी काढले. केवळ १0 रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी माहिती दिली.ते म्हणाले, ‘कोल्हापूरमध्ये ‘शिवभोजन थाळी’ योजनेंतर्गत चार ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यापैकी किमान एका केंद्राचे २६ जानेवारी रोजी कोल्हापूर शहरात उद्घाटन केले जाणार आहे.
महिला बचत गट, हॉटेल, खानावळ यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात येणार आहे. शहरामध्ये एक थाळीचा खर्च ५0 रुपये गृहीत धरून संबंधित संस्था अथवा हॉटेलला प्रत्येक थाळी ४0 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे, तर ग्रामीण भागात ३५ रुपये गृहीत धरून २५ रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेतच केंद्र सुरू ठेवावे लागणार आहे. प्रत्येक तालुका आणि शहराच्या ठिकाणी गरज असेल तेथे केंद्र दिले जाणार आहे. आज, शुक्रवारपासून यासाठी संबंधितांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवित्के, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने उपस्थित होते.शिवभोजन थाळीविषयी थोडक्यात
- कोल्हापूरसाठी थाळींची मर्यादा : ६00 थाळी
- एका केंद्रात थाळी वाटप मर्यादा-७५ ते १५0 थाळी
- एका थाळीतील पदार्थ
- दोन चपाती (प्रति चपाती ३0 ग्रॅम वजनाची)
- एक भाजी (एक वाटी १0 ग्र्र्रॅम वजन)
- वरण - एक वाटी
- भात - एक मुद (१५0 ग्रॅम)
- केंद्रासाठी पात्रता-२५ लोकांची बसण्याची व्यवस्था, जागा स्वमालकीची असणे आवश्यक,
- वर्दळीच्या ठिकाणाला प्राधान्य, संस्था सक्षम असणे आवश्यक.
- थाळी यांना मिळणार नाही
- शासकीय कर्मचारी, अधिकारी
- केंद्रातील कर्मचारी
------------------------------------------------------शहरात या ठिकाणी केंद्राला प्राधान्यसीपीआर, मध्यवर्ती बसस्थानक, भवानी मंडप, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर---------------------------------