- पोपट पवारशिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कार्यात कधीकाळी बिहारच्या नालंदा विद्यापीठाने जगाला भुरळ घातली होती. काळाच्या ओघात नालंदा विद्यापीठाचे वैभव लोप पावलं... मात्र, बंगलोरपासून ७० किलोमीटर दूर तुमकूरच्या सिद्धगंगा मठात नालंदा विद्यापीठाच्या वैभवाची साक्ष देणाºया सामाजिक कार्याने अख्ख्या देशाचे लक्ष वेधले. अर्थात या मठाचे मठाधीश डॉ. शिवकुमार स्वामी यांच्या आधुनिक विचारसरणीनेच हा मठ सर्वच क्षेत्रांत देशाच्या केंद्रस्थानी आला.
कर्नाटकच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक पटलावर डॉ. शिवकुमार स्वामी यांचा प्रभाव हा इतर कोणत्याही धर्मगुरूंच्या तुलनेत कितीतरी मोठा होता. ते ज्या मठाचे मठाधिपती होते, त्या सिद्धगंगा मठाचा इतिहास ७०० वर्षांचा आहे. लिंगायत सांप्रदायाचा सर्वांत मोठा मठ म्हणून तुमकूर येथील सिद्धगंगा मठाची ख्याती आहे. लिंगायत समाजाच्या मठातूनच सत्तेच्या सारीपाटावरील यशापयश ठरविलं जातं. या मठाचे मठाधीश डॉ. शिवकुमार स्वामी यांचा आशीर्वादच समाजाची राजकीय, सामाजिक दिशा ठरवीत असते.
शिवकुमार स्वामी यांच्या निधनाने कर्नाटकाच्या आध्यात्मिक क्षेत्रातील एक तारा निखळला. कन्नड जनतेने देवत्व बहाल केलेला त्यांचा देवही हरपला आहे. १ एप्रिल १९०७ रोजी म्हैसूरजवळील वीरापुरा येथे जन्मलेले स्वामी कर्नाटकातील एक प्रमुख समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते. त्यांनी फक्त लिंगायत समाजाच्याच नव्हे, तर राज्यातील इतर समाजांच्या कल्याणासाठीदेखील विविध उपक्रम, कार्यक्रम राबविले होते. सिद्धगंगा शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून १२५हून अधिक शाळा चालवीत या मठाने कर्नाटकच्या कानाकोपºयांत ज्ञानाचा प्रसार केला आहे.
लिंगायत समाजाचा मठ म्हणून सिद्धगंगा मठ ओळखला जात असला तरी कोणत्याही जातीच्या मुलांना या मठाचे दरवाजे बंद नसतात. शिवकुमार स्वामी यांच्या संकल्पनेतूनच मठाच्या माध्यमातून तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबरोबरच जेवण, राहण्याची सोय करीत शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांतही मोठं योगदान दिले आहे. असं म्हणतात की, या मठाची चूल कधीच बंद होत नाही. रोज २० हजार लोकांना अन्नदान करून या मठाने नवा आदर्श घालून दिला आहे. प्राचीन भाषेचे संवर्धन करतानाच पाश्चिमात्य भाषाही अवगत व्हावी यासाठी स्वामींंनी आपल्या शैक्षणिक संस्थामध्ये या दोन्ही भाषांचा अभ्यासक्रम सुरूकेला आहे. विशेष म्हणजे भारतीय संस्कृतीचा इतिहास सांगणारी देशभरातील सर्वच भाषांमधील पुस्तके सिद्धगंगा मठाने जतन केली आहेत. त्यामुळे देशाच्या प्राचीन संस्कृतीचा ठेवा जपणारं सिद्धगंगा मठ हे आजघडीला देशातील एकमेव केंद्र असावं.
तब्बल १११ वर्षे जीवन जगलेल्या शिवकुमार स्वामी यांच्या आरोग्याचे रहस्यही नेहमीच चर्चेत राहिले. पहाटे अडीच वाजता आपला दिनक्रम सुरूकरणारे स्वामी अगदी शेवटच्या काळातही मठाच्या कारभारात लक्ष घालत होते, हे विशेष. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेत २००७ मध्ये कर्नाटक सरकारने त्यांना ‘कर्नाटकरत्न’, तर २०१५ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविले होते. उच्चशिक्षित असलेल्या शिवकुमार स्वामी यांनी देशभरातील अनेक राजकीय नेत्यांना आपल्या प्रभावाने सिद्धगंगा मठाकडे आकर्षित केले होते.
गत लोकसभा निवडणुकीच्या नमनालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवकुमार स्वामी यांची भेट घेतली होती. अमित शहा आणि राहुल गांधी यांनीही कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी सिद्धगंगा मठाची माती भाळी लावत कर्नाटकच्या सत्तेसाठी स्वामींकडे आशीर्वाद मागितला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून ते डॉ. अब्दुल कलाम यांच्यापर्यंत अनेकजण डॉ. स्वामी यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. दक्षिणेच्या सामाजिक, शैक्षणिक पटलावर गेली सात दशके आपली वेगळी छाप पाडत सामाजिक सुधारणा घडवून आणणाºया डॉ. शिवकुमार स्वामींना विनम्र अभिवादन...