प्रदीप शिंदे / कोल्हापूर गेल्या पाच वर्षांपासून खासगी आरामबसच्या धर्तीवर सेवा देणारी शिवनेरी व्होल्वो बसची कोल्हापूर-पुणे ही सेवा आता २५ एप्रिलपासून बंद होणार आहे. प्रवासी कमी असल्याचे कारण पुढे करीत ती, पुणे-मुंबई (दादर) अशी पळविल्याची चर्चा आहे. यामुळे ऐन उन्हाळी सुटीत प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने याबाबत प्रवाशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोल्हापूर-पुणे ही शिवनेरी व्होल्वो बससेवा १ मे २०१० रोजी कोल्हापुरातून सुरू केली होती. महामंडळाच्या पुणे येथील प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने कोल्हापूर-पुणे येथील शिवनेरीच्या फेऱ्यांचे भारमान पुणे-दादर-मुंबई व ठाणे या मार्गांवरील फेऱ्यांपेक्षा कमी असल्याने तसेच पुणे विभागाकडे असलेल्या भाडेतत्त्वावरील बसेसच्या कराराची मुदत पूर्ण होत असल्याने तसेच पुणे विभागास वाहतुकीसाठी भाडेतत्त्वावरील वातानुकूलित बसेस कमी पडत असल्याने ही सेवा बंद करण्यात आहे. कोल्हापूर-पुणे शिवनेरीचा तिकिटाचा दर ६२५ रुपये आहे. याच मार्गावर वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या व्होल्वोचा दर ४५० रुपये आहे. खासगी आराम बस कंपन्या दर शनिवार-रविवारी काही वेळेला ५०० रुपये घेतात. कोल्हापूर-पुणे शिवनेरी बसने प्रवास करायचा म्हटले की, प्रवाशांना १६५ रुपयांचा जादा भुर्दंड बसत होता. महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयात बसून निश्चित केलेले दर आणि त्यामध्ये बदल करण्याची मानसिकता नसल्याने त्याचा प्रवाशांना मात्र नाहक आर्थिक भुर्दंड बसतो. खासगी गाड्यांइतकाच दर ठेवावा, अशी मागणी प्रवाशांनी वारंवार करूनही त्याकडे महामंडळ गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. त्याचा परिणाम म्हणून प्रवासी खासगी व्होल्वो बसलाच पसंती देत आहेत. याचा परिणाम या महामंडळाच्या ‘शिवनेरी’ सेवेवर होऊ लागल्याने दिसत आहे. कोल्हापुरात पाच वर्षे अखंड सेवा देणारी ही गाडी आता बंद होणार आहे. ६५ हजार प्रवाशांनी केला प्रवास कोल्हापूर - पुणे शिवनेरीचा तिकीट दर जरी जास्त असला तरी १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या दरम्यान ६५ हजार ७०८ प्रवाशांनी या गाडीचा लाभ घेतला. विश्वासार्हता, वेळेत सुटत व पोहोचत असल्याने ही गाडी लोकप्रिय बनली होती. या गाड्यांमार्फत कोल्हापूर विभागाला १६ लाख २७ हजार रुपये इतका फायदा झाला होता. ऐन उन्हाळी सुटीत ही गाडी बंद केल्याने प्रवाशांमधून नाराजी होत आहे.
‘शिवनेरी’ची कोल्हापूर वारी अखेर बंद
By admin | Published: April 19, 2015 1:08 AM