कोल्हापूर : हिंदवी स्वराज संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य वाढविण्याचे काम पुत्र संभाजीराजे यांनी केले, असे प्रतिपादन दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनी रविवारी केले. ते ‘छत्रपती शिवराय आणि शंभूराजे’ या विषयावर ते बोलत होते. येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्यावतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला आयोजित केली आहे. श्री अंबाबाई देवी मंदिरात हे व्याख्यान झाले. यावेळी गोकुळ दूध संघाचे तज्ज्ञ संचालक बाबा देसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ, चाटर्ड अकौटंट (सी.ए.) चेतन पाटील उपस्थित होते.अमर आडके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा संभाजीराजे हे बालपणापासून विविध क्षेत्रांत तरबेज होतेच तसेच त्यांनी युद्धनीती पूर्ण केली. औरंगजेबाशी जसा शिवाजी महाराजांनी लढा दिला तसा संभाजीराजेंनी देऊन औरंगजेबाच्या बंदिवासात असतानाही संभाजीराजे झुकले नाही. यावरून संभाजीराजे हे काकणभर सरस होते व ते मराठ्याचे छत्रपती होते. सूर्याच्या किरणासारखी त्यांची पारख होती. अहमदनगर येथील किल्ले बहाद्दूरगड येथे संभाजीराजे यांना हौतात्म्य प्राप्त झाले, असे ते म्हणाले. या युगात एखादे कुटुंब गडकोट पाहण्यासाठी न जाता माथेरान, महाबळेश्वर अशा थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यास जाते; पण शिवाजी महाराज व संभाजीराजे यांचा गडकोट इतिहास जाणून घेत नाही, अशी खंत आडके यांनी व्यक्त केली. यावेळी राजू मेवेकरी, नंदकुमार मराठे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिवरायांचे स्वराज्य संभाजीराजेंनी वाढवले
By admin | Published: December 07, 2015 12:40 AM