कोल्हापूर : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने यावर्षी दुर्गराज रायगडावरील ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा खासदार संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली दिमाखात साजरा होणार आहे. त्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होणार आहे. ते लक्षात घेऊन प्रशासनाने शिवभक्तांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जादा बस सोडाव्यात, अशी सूचना अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे पदाधिकारी, शिवभक्तांनी मंगळवारी केली.प्रशासनातर्फे पूर्वतयारी बैठक महाड प्रांत कार्यालयात झाली. यावेळी प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी आणि महोत्सव समितीचे पदाधिकारी, शिवभक्त उपस्थित होते. रायगडावर प्रशासनाने पाणी, विजेची सोय करावी. शिवभक्तांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जादा बसेस, पाचाडपासून शटल बस सेवा पुरवावी. पाचाडमधील जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये शिवभक्तांना निवारा उपलब्ध करून द्यावा.
गडावरील जिल्हा परिषद धर्मशाळेचे काम लवकर काम पूर्ण करावे. गडावर व गड पायथ्याला स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी. राजदरबारात चांगला मंडप घालण्यात यावा. पार्किंगचे नियोजन पोलीस प्रशासनाने अतिशय काटेकोरपणे करावे, अशा सूचना समितीचे पदाधिकारी, शिवभक्तांनी केल्या. या सर्व मागण्यांची पूर्तता दि. २० मे पूर्वी करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी प्रतिभा पदलवाड यांनी दिले.
यावेळी महाड गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ, पोलीस उपअधीक्षक तांबे, महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, संजय पवार, समितीचे रायगड येथील पदाधिकारी रघुवीर देशमुख, प्रशांत दरेकर, अनंत देशमुख, अमर पाटील, उदय बोंद्रे, दीपक सपाटे, श्रीकांत शिरोळे उपस्थित होते.
प्रशासनाने अधिकारी नेमावा
या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने एक चार्ज ऑफिसर (अधिकारी) नेमावा, अशी सूचना समिती पदाधिकाऱ्यांनी केली.