कोल्हापूर : कोरोनाच्या दोन वर्षांनंतर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. प्रतिवर्षापेक्षाही यावेळी शिवभक्त प्रचंड संख्येने येणार असल्यामुळे रायगडावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी महादरवाजापासून स्वतंत्र मार्ग आखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय शिवराज्याभिषेक समितीची राज्यव्यापी नियोजन बैठक सोमवारी पुणे येथे पार पडली. यावेळी राज्यभरातून शिवप्रेमी व जिल्हाप्रमुख उपस्थित होते. या बैठकीला संभाजीराजे यांच्यासह युवराज्ञी संयोगीताराजे तसेच शहाजीराजे उपस्थित होते. संभाजीराजे म्हणाले, गेली दोन वर्षे कोरोना परिस्थितीमुळे शिवभक्तांना रायगडावर येता आले नाही त्यामुळे यावर्षीचा शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी पाच ते सहा लाख शिवभक्त रायगडावर येतील.संयोगीताराजे म्हणाल्या, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ऐतिहासिक मूल्य पाहता हा सोहळा शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक झाला पाहिजे. समितीच्या नियोजनानुसार गडावर पाच ते सहा लाख शिवभक्तांचे अन्नछत्र उभारण्यात येणार आहे. राजसदर फुलांनी सजवण्यात येणार असून भवानी पेठ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधीवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. रोपवेसाठी दिव्यांग आणि वृद्धांना प्राधान्य देण्यात यावे आणि शिवभक्तांनी पायी गडावर यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. गडावर मुबलक पिण्याचे पाणी असून आरोग्य नियंत्रण कक्षही उभारण्यात येणार आहेत.
निवासासाठी तात्पुरते तंबू उभारण्यात येणार असून गडस्वच्छतेसाठी एक हजार स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. विराज तावरे यांनी स्वागत केले तर समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले. बैठकीस समितीचे अतुल चव्हाण, धनंजय जाधव,विश्वास काशिद (पुणे), आप्पासाहेब कुडेकर, डॉ. गजानन देशमुख, शुभम आहिरे (औरंगाबाद), गंगाधर काळकुटे (बीड), गजानन देशमुख (अमरावती), विष्णू इंगळे, हनुमंत काकडे (उस्मानाबाद), महेश शिंदे (तुळजापूर), पंकज जायले (अकोला), रमेश पाळेकर (लोणावळा), प्रशांत दरेकर (रायगड), हेमंत साळोखे, संजय पवार, अमर पाटील, उदय घोरपडे, विश्वास निंबाळकर (कोल्हापूर) तसेच विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
५ जून रोजी
- संभाजीराजे आणि शहाजीराजे पायी गड चढणार असून होळीच्या माळावर शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण होईल.
- रायगड प्राधिकरणाच्या आतापर्यंतच्या कामाचे सादरीकरण .
- जागर शाहिरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा हे कार्यक्रम
६ जून रोजी
- सकाळी ध्वजपूजन
- मुख्य शिवराज्याभिषेक कार्यक्रम संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या शुभहस्ते दरबार पुरोहितांच्या मंत्रघोषात, सुवर्ण मुद्रा अभिषेक
- शिवरायांच्या पालखीच्या नगर प्रदक्षिणेने कार्यक्रमाची सांगता