कोल्हापूर : राज्य सरकारने मला केवळ २० लोकांनाच रायगडावर जाण्यासाठी परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझ्यासाठी लाखो शिवभक्तांचे जीव महत्त्वाचे आहेत. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करावा, असे आवाहन गुरुवारी खासदार संभाजीराजे यांनी शिवभक्तांना केले.
प्रत्येक वर्षी ५ व ६ जूनला शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात रायगडावर साजरा केला जातो. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. सरकारनेही केवळ मोजक्या २० लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदासुद्धा ‘शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात’ साजरा करणे ही जबाबदारी शिवभक्तांची ओळख ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मनामनात शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषासह हवेत भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशांच्या कडकडाटाने दुमदुमणाऱ्या कडेकपाऱ्या आणि अखंड शिवरायांचा जयघोषाने दुमदुमणारा रायगड, या सोहळ्याला होणारी लाखो शिवभक्तांची गर्दी आणि लोकोत्सवाचा साज हे वातावरण येथे अनुभवयाला आपण सारे उत्सुक आहात, हे मला माहीत आहे. तरीसुद्धा कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यामुळे मर्यादा आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे लाखो शिवभक्तांनी रायगडवर न येता राज्याभिषेक सोहळा आपल्या घरातच विधायक उपक्रम राबवून साजरा केला. यंदाही हा उत्साह तितक्याच जोमाने साजरा करा.
मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट करणार
तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा ठरल्याप्रमाणे मी राज सदरेवरून रविवारी घोषित करेन, असेही खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रविवारी (दि.६) रोजी मराठा आरक्षणावरील त्यांच्या भूमिकेकडे तमाम सकल मराठ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.