कोल्हापूर : राजकारण आणि शिवराज्याभिषेक मी एकत्र आणणार नाही, एक वेळ निवडणुका आणि राजकारण पुन्हा होतील, पण ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा एकदाच होणार आहे. त्यामुळे ४ जूनपेक्षाही ५ आणि ६ जूनचा शिवराज्याभिषेक सोहळाही माझ्यासाठी महत्वाचा आहे, असे मत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराज छत्रपती यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तर, यंदा दुर्गराज रायगडावर पाच लाखांहून अधिक शिवभक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ या दिवशी झाला. त्या क्षणाची स्मृती रहावी म्हणून २००७ पासून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे. प्रारंभी दोन हजार शिवभक्त होते, गतवर्षी ५ लाख शिवभक्त गडावर होते. यंदाही हा आकडा ओलांडून जाईल असे संभाजीराजे म्हणाले.यावेळी समितीचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी सोहळ्याची सविस्तर माहिती दिली. या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी समितीने पूर्ण झाली असून, एकुण ३७ समित्या नियोजनबध्द काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.५ जून हा शौर्य आणि ६ जून हा भक्तीचा दिवस आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी ५ ठिकाणी अन्नछत्र आहे. शाहीरी कार्यक्रमात २३ शाहीर पोवाडे गाणार आहेत, पालखी मिरवणुकीत १०० मशाली आणि संबळवाद्य असेल, युध्दकला प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी राज्यातून ३५ संघ आणि २५० मावळे सहभागी होणार आहेत. पायथ्याला आणि गडावर मिळून ११ ठिकाणी आरोग्य केंद्र सज्ज राहणार आहेत, धर्मशाळा व इतर ठिकाणी महिलांसह इतर शिवभक्तांची थांबण्याची व्यवस्था केल्याचीही माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला अमर पाटील, हेमंत साळोखे, सुखदेव गिरि, फत्तेसिंग सावंत, धनाजी खोत, उदय घोरपडे, प्रविण उबाळे, धनाजी खोत, दिलिप सावंत, अनुप महाजन, रणजित पाटील, दीपक सपाटे, प्रसन्न मोहिते उपस्थित होते.
असा आहे शिवराज्याभिषेक सोहळा५ जून : दुपारी ३.३० वा : जिजाउ समाधीचे दर्शन (पाचाड), सायंकाळी ४ वा. संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती पायी गड चढण्यास प्रारंभ (नाणे दरवाजा), ४.३० वा : महादरवाजा पूजन व तोरण बांधणे, ५ वा : पंचक्राेशीतील २१ गावांतील सरपंच, गावकऱ्यांच्या उपस्थितीत शहाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन (नगारखाना), ५.३० वा. धार तलवारीची युध्दकला महाराष्ट्राची शिवकालीन युध्दकलांची मानवंदना (होळीचा माळ), ७.१५ वा. आतषबाजी, रात्री ८ वा : जागर शिवशाहीरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा (राजसदर) , ९ वा. गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ (शिरकाई मंदिर), रात्री ९.३० वा. वारकरी संप्रदायाकंडून कीर्तन व भजन (जगदीश्वर मंदिर), ६ जून : सकाळी ७ वा :रणवाद्यांच्या जयघोषात शहाजीराजे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहन (नगारखाना), ७.३० वा. शाहिरी कार्यक्रम (राजसदर), ९.३० वा. शिवरायांच्या पालखीचे वाद्यांच्या गजरात आगमन (राजसदर), १०.१० वाजता संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायाच्या उत्सवमूर्तीस अभिषेक (राजसदर) , १०.२० वा. शिवरायांच्या पुतळ्यास सुवर्णनाण्यांचा अभिषेक (मेघडंबरी), १०.३० वा. सभांजीराजे यांचे मार्गदर्शन, ११ वा. जगदीश्वराच्या दर्शनासाठी शिवरायांच्या मुख्य पाालखी सोहळ्यास प्रारंभ, १२ वा. जगदीश्वराचे दर्शन, १२.१० वाजता शिवरायांच्या समाधीस अभिवादन.