विश्र्वास पाटील कोल्हापूर : शिवसेना व वंचित बहुजन विकास आघाडी यांच्यात राज्यस्तरावर झालेल्या युतीचे जिल्ह्यातील या दोन्ही पक्षांच्या मुख्यत: नेत्यांतून स्वागत झाले. शिवसेनेचे तीन जिल्हाध्यक्ष आहेत व वंचितचे दोघे. त्यांच्यातील एकजूटच ही युती यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची ठरणारी आहे. वंचितने गेली लोकसभा व विधानसभेलाही उमेदवार रिंगणात उतरवले होते. पक्षात फूट पडून सगळे सोडून गेले असताना, नवी युती शिवसेनेला सामाजिक पाया विस्तृत करण्यासाठी उपयोगी ठरणारी आहे. लोकसभा, विधानसभेला युतीचा कितपत प्रभाव पडू शकेल, हे लक्षात येण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी जावा लागेल.दोन भिन्न विचारधारा असलेले हे पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्रित आले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांत गाव, तालुका व जिल्हा पातळीवरही कधीच परस्पर संबंध नाहीत, उलट परस्परांच्या विरोधातच आंदोलन केल्याचा, संषर्घ केल्याचा इतिहास आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कोण, हे वंचितच्या जिल्हाध्यक्षांना माहीत असेल, परंतू वंचितचे जिल्हाध्यक्ष कोण, हे शिवसेनेला माहीत नाही इतके या दोन पक्षांत आजचे अंतर आहे. शिवसेनेचे तीन जिल्हाध्यक्ष सध्या आहेत. वंचितचे कोल्हापूर लोकसभेसाठी आमजाई व्हरवडे येथील दयानंद कांबळे, तर हातकणंगलेसाठी तेरवाडचे विलास कांबळे जिल्हाध्यक्ष आहेत. मुख्यत: प्रकाश आंबेडकर यांना मानणारा गावोगावचा कडवा कार्यकर्ता हाच वंचितचा पाया आहे. भगव्या झेंड्याला खांद्यावर घेऊन लढणारा गावोगावचा निष्ठावंत कार्यकर्ता ही शिवसेनेचीही ताकद आहे. त्यामुळे हे दोन घटक एकत्र आल्यास त्याचा मुख्यत: शिवसेनेला जास्त फायदा होऊ शकतो. शिवसेना महाविकास आघाडीचा घटक म्हणून निवडणुकीला सामोरे गेल्यास त्याचा लाभ या आघाडीला चांगला होऊ शकतो.वंचितने गेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघात हवा केली. त्यांच्या उमेदवाराने लाखावर मतेही घेतली. परंतू ते उमेदवारच गेल्या काही महिन्यामध्ये शिवसेनेत आले आहेत. विधानसभेलाही चंदगड व हातकणंगलेमध्ये त्यांच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली. त्यात चंदगडला स्वत: अप्पी पाटील यांची ताकद होती. हातकणंगलेमध्ये मतदार संघ राखीव असल्याने नवबौध्द मतदारांचे प्रमाण जास्त आहे. त्याचाही फायदा त्यांना झाला. शिरोळमध्येही बऱ्यापैकी मते मिळाली आहेत. निवडणुकीनंतर शिवसेना लोकांचे प्रश्र्न मांडत आली आहे. त्या तुलनेत वंचित फारशी सक्रिय नाही.
गेल्या विधानसभा निवडणुकीतील वंचितचे उमेदवारलोकसभा :हातकणंगले- अस्लम सय्यद - १ लाख १० हजारकोल्हापूर - अरुणा माळी - ७८ हजार
विधानसभा :चंदगड - अप्पी पाटील - ४३८३९राधानगरी - जीवन पाटील - ७७६२कागल : उमेदवार नाहीकोल्हापूर दक्षिण- दिलीप कवडे - २१८५करवीर : डॉ. आनंदा गुरव - ४३६४उत्तर : राहुल राजहंस - ११३०शाहूवाडी - डॉ. सुनील पाटील - २८८१हातकणंगले - एस. आर. कांबळे - ११२०७इचलकरंजी - शशिकांत आमणे - ३६३३शिरोळ - सुनील खोत - ९५१६