कोल्हापूर : शिवसेनेशिवाय कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे योग्य सन्मान देतील त्यांच्याशी युती केली जाईल, असे सांगत संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सत्तेसाठी पाठिंब्याबाबत कॉँग्रेस आघाडीकडेच कल असल्याचे स्पष्ट संकेत दिले. रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर दुधवडकर यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना दुधवडकर यांनी ही भूमिका स्पष्ट केली. त्याआधी सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव, आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजयबाबा घाटगे, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यावेळी उपस्थित होते. त्यांच्याशी दुधवडकर यांनी सविस्तर चर्चा केली. याआधीच मंडलिक यांनी आपला अहवाल दिला आहे. दुधवडकर यांनी एकीकडे पक्ष श्रेष्ठींकडे प्रस्ताव दिल्याचे सांगितले, मात्र नंतर त्यांनी त्यात बदल करीत अजूनही काहीही ठरलेले नाही. स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांशी, स्थानिक आमदारांशी अजूनही चर्चा करणार असल्याचे सांगितले. १५ मार्चला याबाबत पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
शिवसेनेचा कल कॉँग्रेसकडेच
By admin | Published: March 14, 2017 12:40 AM