कोल्हापूर : कोरोनाच्या सलग दोन लाटांमुळे एसटीची चाके हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहेत. सरकारनेही निर्बंध शिथिल केल्यामुळे बस फेऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. लालपरीसह शिवशाही बसही गतिमान होण्यास सज्ज झाल्या आहेत. येत्या काळात प्रवाशांची संख्या वाढताच शिवशाहीही वेग घेईल. जिल्ह्यात १२ आगारांत २३ बस आहेत.
कोरोनाच्या सलग दोन लाटांमुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्य शासनाचे निर्बंध काही अंशी शिथिल होऊ लागले आहेत. त्यामुळे महामंडळाची गाडी काहीअंशी रस्त्यावर वेग घेऊ लागली आहे. कोल्हापूर विभागातील बारा आगारांमध्ये कोरोनापूर्वी २३ महामंडळांच्या व बाहेरील २६ अशा एकूण ४९ शिवशाही बस कार्यरत होत्या. कोरोनानंतर प्रवाशांनी वातानुकूलित बसमधून प्रवास कमी केला आहे. त्यामुळे या बसना काही प्रमाणात मागणी कमी आहे. तरीसुद्धा बोटावर मोजण्याइतपत या बस मुंबई, पुणे मार्गावर कार्यरत आहेत. सध्या नागपूर, नाशिक, औरंगाबाद आदी मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. येत्या काळात गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आहे. शिवशाही बस सज्ज आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे वातानुकूलित असलेल्या या बसना आरक्षण नाही. लालपरीला वाढता प्रतिसाद बघता शिवशाहीलाही सकारात्मक प्रतिसाद लाभेल असा अंदाज अधिकारी वर्गातर्फे व्यक्त केला जात आहे.
बसचे नियमित सॅनिटायझेशन
कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव कमी झाला असला तरी महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने बसच्या सॅनिटायझेशनकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. लालपरीसह शिवशाही बसच्या फेऱ्या झाल्यानंतर तात्काळ कार्यशाळेमधून सॅनिटाईज केली जाते. या बसच्या सॅनिटाईजकडे वरिष्ठ अधिकारीही लक्ष ठेवून असतात. विशेषत: एअरप्रेशरने या बस निर्जंतुक केल्या जातात. वातानुकूलित यंत्रणा कार्यरत असल्याने या बसच्या सॅनिटायझेशनकडे विशेष लक्ष दिले जाते.
एकूण आगार -१२
शिवशाही बसची संख्या -२३
या मार्गावर सुरू आहेत शिवशाही
कोल्हापूर -पुणे - ९
कोल्हापूर -मुंबई-५
कोल्हापूर- नाशिक- ३
कोल्हापूर -औरंगाबाद - ३
कोल्हापूर -नागपूर -३
सर्वच मार्गांवर प्रतिसाद अल्प
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मार्गांवरील शिवशाही बसना सध्या तरी अल्प प्रतिसाद आहे. येत्या काळात सर्वच पूर्वपदावर येऊ लागल्यामुळे या बसनाही मागणी वाढेल. विशेष म्हणजे कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-मुंबई या मार्गावर शिवशाही बसना मोठी मागणी असते. येत्या काळात याही बस लालपरीसारख्या पूर्ववत होतील.
शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, एस.टी. महामंडळ कोल्हापूर विभाग