प्रदीप शिंदे ।
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज, वातानुकूलित ‘शिवशाही’ बसगाडीला ‘लाल परी’प्रमाणेच लग्नसराईसाठीही मागणी वाढली आहे. अवघ्या तीन महिन्यांतच लग्नसराईतून या गाडीमार्फत कोल्हापूर विभागाला नऊ लाख १५ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. एप्रिलअखेर दहा ‘शिवशाही’ गाड्यांचे वºहाडांसाठी बुकिंग झाले आहे.राज्य परिवहन महामंडळाने एस. टी.चे मूळ प्रवाशांना टिकविण्यासाठी आणि एस.टी.पासून दुरावलेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ‘शिवशाही’ ही बससेवा सुरू केली आहे. या अंतर्गत तब्बल ५०० बस राज्यभर टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जात आहेत. ‘हिरकणी’ म्हणजेच निमआराम प्रकारातील बसच्या तिकिटाच्या जवळपास जाणारेच ‘शिवशाही’ बसचे तिकीट असल्याने प्रवाशांना ही गाडी परवडत आहे.वाढत्या उष्णतेमुळे वातानुकूलित ‘शिवशाही’ गाडीला प्रवाशांची मागणी वाढत आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांत लग्नसराईसह अभ्यासदौरा व सहलीसाठी मोठ्या प्रमाणात शिवशाही गाडीचे बुकिंग झाले. या कालावधीत कोल्हापूर विभागात यामार्फत ‘शिवशाही’ने १७ हजार किलोमीटरद्वारे नऊ लाख १५ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. कोल्हापूर विभागाकडे २६ ते ३० एप्रिलदरम्यान लग्नसराईसाठी दहा गाड्यांचे बुकिंगही झाले आहे. यामधून सुमारे आठ लाखांचा महसूल कोल्हापूर विभागाला मिळण्याची शक्यता आहे.दर ५४ प्रतिकिलोमीटर सेमी (निमआराम) गाडीसाठी प्रतिकिलोमीटरचा दर ४६ रुपये व ३५ प्रवाशांची आसनक्षमता आहे. साध्या गाडीचा (परिवर्तन) दर ४८ रुपये प्रतिकिलोमीटर दर आहे. तिची ४५ प्रवाशांची आसनक्षमता आहे. ‘शिवशाही’ गाडीचा दर प्रतिकिलोमीटर ५४ रुपये आहे. यामध्ये ४३ आसनक्षमता आहे. निमआराम गाडीच्या जवळपास ‘शिवशाही’ गाडीचा दर असल्यानेयंदा लग्नसराईत या गाडीची मागणी वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.