हा चौक महामार्गाकडे जाण्यासाठी आणि कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी सोईस्कर मार्ग समजला जातो. तसेच शिये-भुये मार्गे जोतिबा, पन्हाळगडावर जाण्यासाठी आणि दळणवळणासाठी याच मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या ठिकाणी दोन महत्त्वाचे चौक आहेत.
येथे राजीव गांधीनगर झोपडपट्टी तसेच खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. सूर्य मावळला की हा चौक सुनसान आणि भयाण होतो. तसेच येथे अनेक अपघात आणि गुन्हेही घडत होते. यामुळे शिरोली पोलीस ठाण्याच्या वतीने व्यावसायिक, तसेच दानशूर व्यक्तींना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लोकसहभागातून शिये फाटा येथील दोन्ही चौकांत एकूण सहा सीसीटीव्ही कॅमेरे, पाच हायमास्ट दिवे आणि ग्रास लॉन लावून सुशोभीकरण करण्यात आले. त्यामुळे हा परिसर आता प्रकाशमय झाला आहे. तसेच परिसरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यास मोठी मदत मिळणार आहे. रविवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी या लोकसहभागातून केलेल्या कामाचे कौतुक केले. शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी टोप आणि शिये परिसरातील क्रशर व्यावसायिक, उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, नागरिकांचे या उपक्रमासाठी मदतीचा हात दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रम टोप सरपंच रूपाली तावडे, संग्राम लोहार, तानाजी पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. आर देवकाते, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
शिये फाटा येथील सुशोभीकरण आणि हायमास्ट दिव्यांचे उद्घाटन जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी केले. यावेळी करवीरचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, सरपंच रूपाली तावडे, उपसरपंच संग्राम लोहार, तानाजी पाटील, आदी उपस्थित होते.